जीएसटीचे दर : अन्नधान्य, दूध करमूक्त तर एसी-फ्रिज होणार स्वस्त
By admin | Published: May 18, 2017 09:40 PM2017-05-18T21:40:55+5:302017-05-18T21:40:55+5:30
वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी अंतर्गत वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या कराच्या दरांबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये एकमत झाले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - वस्तु आणि सेवा कर अर्थात जीएसटी अंतर्गत वस्तूंवर लावण्यात येणाऱ्या कराच्या दरांबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये अखेर एकमत झाले आहे. जीएसटी प्रणालीनुसार गुरूवारी जीएसटी परिषदेने एकूण 1211 वस्तूंचे दर निश्चित केले आहेत. या धोरणातून धान्य आणि दूध करमूक्त करण्यात आले आहेत तर एसी आणि फ्रिजसारख्या अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. आज श्रीनगरमध्ये सुरू झालेल्या दोन दिवसीय जीएसटीच्या काउंसिल बैठकीत दैनंदिन वस्तुंवरील टॅक्स दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जीएसटी परिषदेची पहिली बैठक झाली. बैठकीत एकूण 1211 वस्तूंचे दर जीएसटीनुसार निश्चित करण्यात आले. यामध्ये अनेक वस्तूंवरील कर कमी झाले आहेत, असं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली म्हणाले.आज चर्चा झालेल्या वस्तूंमध्ये 81 टक्के वस्तूंवर 18 टक्के आणि त्याहून कमी कर लावण्यात आला आहे. केवळ 19टक्के वस्तूंवर सर्वाधिक 28 टक्के कर निश्चित करण्यात आला आहे. तर सोने आणि बीडीवर किती टॅक्स लावला जाणार यावर उद्या, शुक्रवारी निर्णय होणार आहे. सर्विस टॅक्सचे दर दुसऱ्या दिवशी ठरवण्यात येणार आहेत.
दूध जीएसटीमधून वगळण्यात आलं आहे. मिठाई, साखर , चहापत्ती, कॉफी आणि कोळश्यावर 5 टक्के लावण्यात आला आहे. टूथपेस्ट , हेअर ऑईल आणि साबणावर 18 टक्के टॅक्स लावला आहे. सध्या या वस्तुवर 28 टक्के टॅक्स लावला जातो. कोळसा आणि मसाल्यांवर 5 टक्के टॅक्स, करमणूक, हॉटेल आणि रेस्टॉरेंटवर 18टक्के टॅक्स लागणार आहे. छोट्या कारवर 28 टक्के टॅक्ससह अतिरिक्त कर लावला जाणार आहे. लक्झरी कारवर टॅक्ससोबतच 15 टक्के अतिरिक्त कर लावला जाईल. एसी आणि फ्रिजला सुद्धा 28 टक्के टॅक्सच्या गटात ठेवण्यात आले आहे. सध्या यावर 30 ते 31 टक्के टॅक्स लावला जातो. तर अन्नधान्य स्वस्त होणार आहे.