जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला येणार अच्छे दिन-वर्ल्ड बँक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 10:21 AM2017-10-06T10:21:52+5:302017-10-06T10:23:18+5:30
मोदी सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचं जागतिक बँकेने समर्थन केलं आहे.
नवी दिल्ली- जीएसटीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला सगळीकडूनच टीकेचा धनी व्हावं लागतं आहे. पण आता मोदी सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचं जागतिक बँकेने समर्थन केलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक आहे. जीएसटी लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही संपूर्ण मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असं जागतिक बँकेने म्हटलं आहे. जीएसटी लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील, असं जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी म्हंटलं आहे. जीएसटी लागू केल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यात अर्थव्यवस्थे घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, येत्या काळात हा आलेख नक्कीच उंचावेल, असा विश्वास जिम योंग किम यांनी व्यक्त केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेल्या घसरणीवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर सगळीकडूनच टीका केली जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील व्यापाराला चालना मिळावी यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचं फळ देशाला नक्की मिळेल, असंही किम यांनी म्हंटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरेृं दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ आपल्या भेटीसाठी पुढील आठवड्यात येत असल्याची माहितीही जिम योंग किम यांनी दिली आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेने आता वेग पकडायला सुरूवात केली असून व्यापारही वाढतो आहे. पण, आता गुंतवणुकीचं प्रमाण कमी झालं आहे, ही बाब काहीशी निराशाजनक आहे. काही धोरणांमध्ये अनिश्चितता असल्याचं मत किम यांनी मांडलं. जगातील सगळ्याच देशांनी अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर काम करणं आवश्यक आहे. तसंच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याची आणि नवे गुंतवणूकदार तयार करण्याचीही आवश्यकता आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि रोगराई यांसारख्या संकटांमुळे काही आव्हानं उभी राहू शकतात. पण, त्यांच्याशी संघर्ष करून जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सगळ्याच देशांनी प्रयत्नशील असलं पाहिजे, असेही किम यांनी म्हटलं आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी, यासाठी प्रयत्न करत आहेत.पण तरीही भारतापुढे सध्या अनेक आव्हानं आहेत. निरक्षरता ही भारतातील एक मोठी समस्या आहे. तसंच आरोग्यविषयक आव्हानांना भारत तोंड देतो आहे. तरीही भारत इतर देशांप्रमाणे प्रगती करेल, यात शंका नाही, असा विश्वास किम यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहितासाठी काही कठोर निर्णय घेतले. त्यांनी सगळ्या देशाशी संवाद साधत जनतेच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला, ही बाब निश्चितच समाधानकारक असल्याचं किम यांनी म्हंटलं.