लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 07:34 AM2023-12-04T07:34:25+5:302023-12-04T07:34:52+5:30

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले

Guaranteed hat-trick of Laksabha, PM Narendra Modi believes; Jubilation at BJP headquarters | लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

लाेकसभेच्या हॅट्ट्रिकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींचा विश्वास; भाजप मुख्यालयात जल्लोष

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उत्कृष्ट कामगिरीचे ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा विजय आहे. तसेच, राज्यांमधील हॅटट्रिक ही २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत जिंकण्याची हॅटट्रिकची गॅरंटी आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मतदारांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या या पक्षांना त्यांचे मार्ग सुधारण्याचा इशारा दिला आहे अन्यथा लोक त्यांना संपवतील. चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या बाजूने निकाल आल्यानंतर पंतप्रधान मोदी भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. तत्पूर्वी, ते पक्षाच्या मुख्यालयात पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

केवळ घराणेशाहीतील नेत्यांचा एकत्रित फोटो लोकांचा विश्वास जिंकू शकत नाही

विजय ऐतिहासिक, अभूतपूर्व आहे. आज सबका साथ, सबका विकास ही भावना जिंकली आहे. हा निकाल भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमच्या लढाईला लोकांचा पाठिंबा दर्शवतो. इंडिया आघाडीला धडा मिळाला आहे की, केवळ घराणेशाहीतील काही नेत्यांना व्यासपीठावर एकत्रित केल्याने चांगला फोटो मिळेल. परंतु, लोकांचा विश्वास जिंकू शकत नाहीत. केंद्राचा विकास आणि लोकांमध्ये कोणीही येऊ नये, अन्यथा जनता त्यांना दूर करेल. लोक आधीच म्हणत आहेत की, राज्यांमध्ये आमची हॅटट्रिक ही लोकसभेतील विजयाची हमी आहे. 

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे आगामी लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले. त्या निवडणुकांत भाजपने नेत्रदीपक यश मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच हा विजय मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपमधील दिग्गज नेत्यांनी व्यक्त केली आहे. पाच राज्यांपैकी चार राज्यांची रविवारी मतमोजणी झाली तर मिझोराममध्ये उद्या, सोमवारी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत. 

महिला, तरुण, गरीब अन् शेतकऱ्यांचे सक्षमीकरण 
मोदी म्हणाले की, विकसित भारताच्या आमच्या अजेंड्याला लोक अधिकाधिक पाठिंबा देत आहेत. भक्कम बहुमत असलेल्या स्थिर सरकारला लोक मतदान करत आहेत हे जग पाहत आहे. स्वार्थी राजकारण आणि राष्ट्रहिताचे राजकारण यातील फरक लोक जाणू शकतात. मजबूत भाजप देशाचा आणि प्रत्येक कुटुंबाचा विकास घडवून आणतो हे त्यांच्या लक्षात आले आहे. महिला, तरुण, गरीब आणि शेतकरी या चार मोठ्या जाती असून त्यांच्या सक्षमीकरणामुळे देशाचे सक्षमीकरण होईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

मी तुम्हाला पूर्ण प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे. देशाच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल होत आहे आणि देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. - नरेंद्र माेदी, पंतप्रधान

मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील जनादेश मी नम्रपणे स्वीकारतो. तथापि, विचारसरणीची लढाई सुरू ठेवू. तेलंगणातील जनतेचा मी खूप आभारी आहे. आम्ही निश्चितपणे तेलंगणाला लोकांचे सरकार देण्याचे वचन पूर्ण करू. सर्व कार्यकर्त्यांचे मेहनत व पाठिंब्याबद्दल खूप खूप आभार. - राहुल गांधी, काॅंग्रेस नेते

Web Title: Guaranteed hat-trick of Laksabha, PM Narendra Modi believes; Jubilation at BJP headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.