अमरनाथसाठी १४ हजार जवानांचा पहारा
By admin | Published: May 16, 2017 01:46 AM2017-05-16T01:46:19+5:302017-05-16T01:46:19+5:30
काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काश्मीरमधील अशांत परिस्थिती लक्षात घेता यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा निर्णय लष्कराने घेतला आहे. संपूर्ण यात्रेच्या मार्गावर लष्कर, निमलष्करी दले आणि स्थानिक पोलिसांचे १४ हजार जवान डोळ्यात तेल घालून यात्रेकरूंच्या सुरक्षेची काळजी वाहणार आहेत.
३०० कि.मी.च्या यात्रा मार्गावर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट सुरक्षा जवान तैनात असतील. ही यात्रा २९ जून ते ७ आॅगस्ट अशी व्हायची आहे. यात्रेला देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यात्रेचा बराचसा भाग दक्षिण काश्मीरमधून जातो. याच भागात दगडफेक आणि सुरक्षा दलांवर हल्ले होत असल्यामुळे यात्रेबाबत काहीशी चिंता निर्माण झाली असली तरी यात्रा निर्विघ्न व्हावी यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांनी कंबर कसली आहे.
मार्गावरील संवेदनशील भागात दोन बटालियन तैनात करण्याचे लष्कराचे नियोजन आहे. एका बटालियनमध्ये एक हजार सैनिक असतात. याशिवाय केंद्रीय राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दल यांनी १०० हून अधिक कंपन्या तैनात करणार आहेत. (एका कंपनीत १०० जवानांचा समावेश असतो.) गेल्यावर्षी याच्या निम्म्याच कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या.