Gudi Padwa 2018- गंगा घाटावर संगीतमैफलीतून अवतरणार उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र राज्याची संस्कृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 05:29 PM2018-03-16T17:29:48+5:302018-03-16T17:29:48+5:30
वाराणसी शहरामधील ऐतिहासिक दशवशमेध आणि राजेंद्र घाटावर महाराष्ट्रातील अभंग आणि उत्तरप्रदेशमधील ठुमरी, बिरहा आणि इतर भक्तिरसपूर्ण गाण्यांचा संगम ऐकायला मिळणार आहे.
मुंबई- वाराणसी शहरामधील ऐतिहासिक दशवशमेध आणि राजेंद्र घाटावर महाराष्ट्रातील अभंग आणि उत्तरप्रदेशमधील ठुमरी, बिरहा आणि इतर भक्तिरसपूर्ण गाण्यांचा संगम ऐकायला मिळणार आहे. ‘हर हर गंगे’ कार्यक्रमाचे हे दुसरं पर्व असून ते यावेळी अधिक मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आलं आहे.
मुंबई येथील ‘माध्यम’ या सांस्कृतिक संस्थेने येत्या १८ मार्चला ही संगीतमैफल आयोजित केली आहे. गुढीपाडव्याचे औचित्य साधत यावेळी गंगा घाटावर गुढीची उभारणी करण्यात येणार आहे.
१८ तारखेची सुरुवात प्रख्यात बासरीवादक पं. रोणू मुजुमदार यांच्या सुरेल बासरीवादनाने होणार आहे. त्यानंतर श्री. मुजुमदार महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांची संस्कृती बासरीवादनातून सादर करणार आहेत. दिवंगत श्रेष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. आनंद भाटे त्यानंतर आपले गायन सादर करतील. त्यानंतर श्री. मुजुमदार आणि श्री. भाटे दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक बंध आपल्या कलेतून संगीतरसिकांसमोर उलगडतील.
वाराणसीचे आयुक्त श्री. नितीन गोकर्ण, काशी मराठी समाजाचे सुमारे ४५० सदस्य, डॉ. लेनिन लघुवंशी, ‘पीपल्स व्हिजीलन्स कमिटी ऑन ह्युमन राईट्स’ या ‘एनजीओ’ संघटनेचे सदस्य, बनारसी साडी तयार करणारे कामगार तसेच वाराणसीचे नागरीक या संगीत मैफलीचा श्रोते म्हणून आस्वाद घेणार आहेत.
'माध्यम’चे संस्थापक श्री. राहुल बगे म्हणाले, “गंगा घाटावर गुढीपाडव्याच्या निमित्त गुढी उभारण्यात येणार आहे. त्यामधून उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक बंध किती पक्का आहे, याची जाणीव होते. वाराणसीचे आयुक्त श्री. नितीन गोकर्ण हे मूळचे मराठी असून दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी त्यांनी आतापर्यंत बरेच प्रयत्न केले आहेत. गुढी उभारण्यासाठी लागणारे वस्त्र हे स्थानिक हस्त विणकरांनी तयार केले असून ते hiranya.org या पोर्टलने उपलब्ध केले आहे. विणकरांबद्दलची ही पहिलीच वेबसाईट आहे. वाराणसीमधील विणकरांच्या कलेला सलाम करण्यासाठी मोठ्या संख्येने विणकरी समाज या संगीत मैफलीला उपस्थित राहणार आहे.
“पहिले बाजीराव पेशवे, अहिल्यादेवी होळकर, राणी लक्ष्मीबाई यांचे मराठा शासन असताना काशी (वाराणसी) घाट उभारण्यात आला होता. आजच्या पिढीला ही माहिती करून देण्याच्या दृष्टीनेही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामुळे वाराणसीमध्ये निवासास असलेली मराठी भाषिकांची दहावी पिढी एकत्र येणार आहे. नदीकाठांवरील ऐतिहासिक जागांवर आयोजित करण्यात येणाऱ्या अशाप्रकारच्या कार्यक्रमांद्वारे आपली उच्च संस्कृती, परंपरा दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. संस्कृती आणि सामाजिक घडामोडींचा हा संगम आहे.”
“नदी किनारी सामाजिक-सांस्कृतिक गोष्टींचा संगम घडविण्यासाठी ‘माध्यम’ने खूप मोठा पुढाकार घेतला आहे. गंगाकिनारी असलेल्या काशीसारख्या पवित्र ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशी आपले गायन सादर करता येतेय, याचा मला खूप आनंद झाला आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश यांनी सांभाळलेल्या सांस्कृतिक, सामाजिक परंपरेचा हा संगम असेल.” असे मत पं. आनंद भाटे यांनी व्यक्त केले.
वाराणसीचे आयुक्त श्री. नितीन गोकर्ण म्हणाले, “उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा सांस्कृतिक इतिहास शतकांपलीकडचा असून त्यामध्ये मराठा, पेशवे, महाराणी अहिल्याबाई होळकर, शिंदे आणि भोसले घराण्यांचा समावेश होतो. या सर्व घराण्यांनी १७००च्या शतकात काशी शहराची उभारणी केली. होळकर आणि शिंदे घराण्यांनी काशी येथील नदीकिनाऱ्यांवरील विविध घाट उभारण्यासाठी पुढाकार घेतला. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी या शहरामध्ये मंदिरांची पुर्नभारणी केली. पेशवाईतील नाना फडणवीस यांचे वाराणसीमधील निवासस्थान हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्वाचे केंद्र होते. राणी लक्ष्मीबाई यांचे माता-पिता हे मराठीभाषिक होते. विवाहबद्ध होऊन झाशीची राणी होण्यापूर्वी राणी लक्ष्मीबाईंचे बालपण वाराणसी शहरात गेले होते. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रामधील संस्कृती बऱ्यापैकी सारखी असून त्यांना पुन्हा एकत्र आणत इतिहास जिवंत ठेवण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे.”
पं. रोणु मजुमदार म्हणाले, “या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होतो आहे. भारतामधील विविध राज्यांमध्ये अशा सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमांचे आयोजन हे केवळ महत्त्वाचे नसून ती एक काळाची गरज आहे. वाराणसी आणि महाराष्ट्राला उच्च संस्कृती मूल्ये लाभली आहेत. ‘माध्यम’, वाराणसीमधील सांस्कृतिक विभाग आणि ‘एमटीडीसी’च्या वतीने समाजासाठी एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही देशांमध्ये एक चांगला संस्कृती सेतू बांधला जावा, या दृष्टीने मी काहीतरी वेगळी कला यावेळी सादर करणार आहे.”
‘माध्यम’ नेमकं काय?
देशातील नदीकिनाऱ्यांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून भारतजोडणी करण्याचा हा उपक्रम आहे. या आधी याच संस्थेने गायक महेश काळे यांच्यासमवेत आळंदी येथील इंद्रायणी आणि ज्ञानेश्वर घाटांवर कीर्तन कार्यक्रम सादर केले होते. कार्तिक एकादशीच्या पूर्वसंध्येला- २४ नोव्हेंबर २०१६ रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीत कार्यक्रमाला एक लाखांहून अधिक वारकरी उपस्थित होते.
‘माध्यम’द्वारे वाराणसी येथील संगीत मैफलीद्वारे तेथे राहणाऱ्या दहाव्या मराठी पिढीतील ४५० मराठी कुटुंबियांना एकत्र आणले जाणार आहे. त्याखेरीज या कार्यक्रमाद्वारे विणकर समाज, उत्तरप्रदेशमधील रहिवासी, बनारसी विणकर एकत्र येणार आहेत.