सराफांच्या पाडव्यावर काळी गुढी
By admin | Published: April 7, 2016 11:50 PM2016-04-07T23:50:04+5:302016-04-07T23:55:54+5:30
अहमदनगर : अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सराफ बाजार शुक्रवारी (दि.८) बंद राहणार आहे. सोने खरेदीसाठी पाडव्याच्या मुहूर्ताला प्रथमच ब्रेक लागणार
अहमदनगर : अबकारी कराच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे सराफ बाजार शुक्रवारी (दि.८) बंद राहणार आहे. सोने खरेदीसाठी पाडव्याच्या मुहूर्ताला प्रथमच ब्रेक लागणार असून, व्यापारी बाजारात काळी गुढी उभारणार आहेत़
साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त. चैत्र प्रतिपदा म्हणजे मराठी वर्षाचा पहिला दिवस. या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते. लग्न तारखा सुरू असल्याने अनेक जण पाडव्यालाच सोने खरेदीचा मुहूर्त साधतात. अबकारी कराच्या विरोधात एक महिन्यापासून सराफा व्यावसायिकांचा बंद सुरू आहे.
महिनाभरापासून बंद असलेली सोन्याची दुकाने गुढीपाडव्याला उघडतील, अशी ग्राहकांची अपेक्षा होती. मात्र तीही यंदा फोल ठरली आहे.
सोन्यावरील उत्पादन शुल्काच्या (अबकारी कर) निषेधार्थ सुरू असलेला देशव्यापी बंद गुढीपाडव्यालाही सुरूच ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनच्या गुरुवारी पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष व कृती समितीचे अध्यक्ष फत्तेचंद राका यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सराफांचा देशभर संप सुरू आहे. सराफा व्यावसायिकांचा उत्पादन शुल्काला असलेला विरोध कायम आहे. त्यामुळे हे शुल्क रद्द होईपर्यंत बेमुदत संप सुरूच राहणार आहे.