घोटाळ्यातील दोषींची गय करणार नाही
By admin | Published: August 2, 2015 10:43 PM2015-08-02T22:43:39+5:302015-08-02T22:43:39+5:30
व्यापमं घोटाळ्यातील एकाही दोषीची गय केली जाणार नाही, असे सांगत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली
नवी दिल्ली : व्यापमं घोटाळ्यातील एकाही दोषीची गय केली जाणार नाही, असे सांगत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळून लावली.
व्यापमं घोटाळा उघडकीस आल्यानंतर मीच सर्वप्रथम एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला होता. या घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता आम्ही विशेष कृती दल (एसटीएफ) स्थापन केले. उच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली होती. दोन वर्षांपूर्वी विधानसभेत उत्तर देताना मी घोटाळ्याची कबुली दिली होती. व्यावसायिक परीक्षा मंडळाकडून लाखोंची रोजगारभरती करताना काही नियुक्त्यांमध्ये अनियमितता आढळून आली होती. त्याचा तपास सुरू आहे, आम्ही एकाही दोषीला सोडणार नाही, मग तो कितीही मोठा असो, असे ते ई-मेल मुलाखतीत म्हणाले. व्यापमं घोटाळ्यातील काही राजकारणी, राजकीय कार्यकर्ते आणि नोकरशहांना तुरुंगात जावे लागले. याचा अर्थ आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाही, असा होतो. आम्ही पारदर्शक तपास चालविला आहे. कुणीही मागणी केली नसताना व्यापमं घोटाळ्याचा तपास हाती घेतला. तपास एसटीएफकडे सोपविला. राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आता सीबीआयकडून तपास सुरू आहे. देशवासीयांचा सीबीआय आणि न्यायालयीन प्रक्रियेवर विश्वास आहे, असेही त्यांनी नमूद केले.