अरविंद केजरीवाल यांना धक्का! गुजरातमधील आमदाराचा राजीनामा, भाजपा प्रवेशाच्या चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:30 PM2023-12-13T21:30:44+5:302023-12-13T21:30:44+5:30
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे पाच आमदार आहेत. पैकी एका आमदाराने राजीनामा दिला.
AAP MLA Resigned: एका बाजूला देशभरात विविध घडामोडी घडत असताना दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक मोठा धक्का बसला आहे. गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने राजीनामा दिला असून, हा आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे पाच आमदार निवडून आले होते. यातील आमदार भूपेंद्र भयानी यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जुनागड येथील विसावदर मतदारसंघातून ते निवडून आले होते. अवघ्या एका वर्षांत भूपेंद्र भयानी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यांत भाजपमध्ये जाण्याचे संकेत भूपेंद्र भयानी यांनी दिले होते. यानंतर आता वर्षभराने गुजरात विधानसभा अध्यक्षांकडे भूपेंद्र भयानी यांनी आपला राजीनामा सोपवला.
मतदारसंघासाठी आपल्याला विकासकामे करायची आहेत
राजीनामा सुपूर्द केल्यानंतर भूपेंद्र भयानी म्हणाले की, गुजरातमध्ये प्रलंबित प्रश्न मांडण्यासाठी कुणी नाही. जनतेसाठी आणि मतदारसंघासाठी आपल्याला विकासकामे करायची आहेत, त्यामुळेच राजीनामा दिला, असे भूपेंद्र भयानी यांनी सांगितले. मागील गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे ५ आमदार विजयी झाले होते. या आमदारांमध्ये भूपेंद्र भयानी यांचाही समावेश होता. भूपेंद्र भयानी यांना ६६,२१० मते मिळाली. भाजपचे हर्षदकुमार रिबडिया दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ५९,१४७ मते मिळाली. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला केवळ १६,९६३ मते मिळाली होती.
दरम्यान, भूपेंद्र भयानी यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात विधानसभेतील आम आदमी पक्षाच्या आमदारांची संख्या आता चार झाली आहे. राज्यातील एकूण १८२ आमदारांपैकी १५६ भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. भाजपला ३ अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे.