गुजरात विधानसभा : भाजपाचे 70 उमेदवार जाहीर, मुख्यमंत्री रुपानी राजकोटमधून लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:21 AM2017-11-18T00:21:43+5:302017-11-18T00:22:14+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी ७० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत काँग्रेसमधील पाच बंडखोर व ४० विद्यमान आमदार आहेत. या यादीत भाजपने १६ नव्या चेह-यांनाही संधी दिली आहे.
१८२ सदस्यांच्या विधानसभेसाठी ९ व १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. राघवजी पटेल, धर्मेंद्रसिंह जाडेजा, रामसिंह परमार, मानसिंह चौहान आणि सी. के. रावोलजी यांचा बंडखोरांत समावेश आहे. या पाचही जणांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत, तसेच राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसकडून अहमद पटेल उभे असताना भाजपला पाठिंबा दिला होता. राजकोट (पश्चिम) मतदारसंघातून मुख्यमंत्री विजय रुपानी यांना उमेदवारी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री नितीनभाई पटेल हे मेहसाना व गुजरात प्रदेश भाजपचे अध्यक्ष जितूभाई वाघानी हे भावनगर मतदारसंघातून उमेदवार आहेत.
१७ पटेल, १८ ओबीसी...
७० उमेदवारांत १७ पटेल, १८ इतर मागासवर्गीय (ओबीसी), तीन अनुसूचित जाती व ११ अनुसूचित जमातींचे उमेदवार आहेत. ओबीसी उमेदवारांतील बहुसंख्य हे ठाकोर असून, त्यानंतर कोळी समाजाचे आहेत, असे सूत्रांनी सांगितले. नावांची यादी भाजपच्या मध्यवर्ती निवडणूक समितीने बुधवारच्या बैठकीत अंतिम केली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा होते व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथसिंह व परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज व इतर नेते उपस्थित होते.