Gujarat Assembly Election 2022: मोरबीच्या आमदाराचा पत्ता कट, अपघातावेळी नदीत उडी मारलेल्या भाजपा नेत्याला मिळाले तिकिट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:16 PM2022-11-10T12:16:01+5:302022-11-10T12:21:31+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने (BJP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पूल दुर्घटनेमुळे चर्चेत आलेल्या मोरबी (Morbi Bridge Collapse) भागातील माजी आमदार कांतिलाल अमृतिया यांना भाजपाने तिकिट दिले आहे. मोरबी विधानसभेचे विद्यमान आमदार ब्रिजेश मेरजा यांना पक्षाने तिकीट दिले नाही. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत ब्रिजेश यांनी कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर २०२०च्या पोटनिवडणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते.
कोण आहेत कांतिलाल अमृतिया?
कांतिलाल भाई हे भाजपाचे जुने नेते आहेत. २०१२ आणि २०१७ मध्ये ते मोरबी विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. मोरबी पूल दुर्घटनेनंतर कांतिलाल मदत आणि बचाव कार्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. मोरबी पुलाच्या दुर्घटनेनंतर त्यांनी ट्यूब घालून पाण्यात उडी मारली होती. त्यांच्या या धाडसामुळे काही लोकांचे प्राण देखील वाचले असल्याचे सांगितले जाते. माहितीनुसार, कांतिलाल हे आधी तिकिट मिळवणाऱ्यांच्या यादीत नव्हते, मात्र अपघातानंतर बचाव कार्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर त्यांना तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
મોરબીમાં ઝુલતા પુલની દુર્ઘટના ખુબ જ કમનસીબ છે. હું સ્થળ પર જ છું. સૌને નમ્ર અપીલ કે આ દુઃખની ઘડીમાં આપણે સૌ સાથે મળી શક્ય તેટલા લોકોને મદદરૂપ થઈએ.
— Kantilal Amrutiya (@Kanti_amrutiya) October 30, 2022
નોંધ:જે જગ્યાએ બચાવ કાર્ય ચાલુ છે ત્યા ખોટી ભીડ ના કરીએ જેથી રાહતકાર્યમાં કોઈ અડચણ ના આવે.@narendramodi@AmitShah@Bhupendrapbjppic.twitter.com/s5HG2ZY0zt
१ आणि ५ डिसेंबरला होणार निवडणुका
गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. केंद्रीय निवडणूक समितीने गुजरात निवडणुकीसाठी पक्षाच्या १८२ उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजपा अध्यक्ष सीआर पाटील, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यासह अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"