भाजप हार्दिक पटेलसह या स्टार क्रिकेटरच्या पत्नीला उतरवू शकतो गुजरात निवडणुकीच्या मैदानात, अनेकांचा पत्ता कटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 12:59 AM2022-11-09T00:59:54+5:302022-11-09T01:03:22+5:30
Gujarat Assembly Election 2022 : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची धावपळ वाढली आहे. मंगळवारी (८ नोव्हेंबर) गृहमंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गुजरात निवडणुकीसंदर्भात भाजपच्या कोअर ग्रुपची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप हिमाचल प्रदेशप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक विद्यमान आमदारांची तिकिटे कापण्याची शक्यता आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सर्व नेते पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी पोहोचले. येथे अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा विचार करण्यासाठी गुजरातमधील पक्ष नेत्यांची बैठक घेतली.
या बैठकीत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रोपला, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरात भाजप अध्यक्ष सीआर पाटील आणि संघटन महामंत्री बीएल संतोष उपस्थित होते. या शिवाय गुजरात संघटन महामंत्री रत्नाकरही या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक जवळपास 3 तास चालली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये भाजप 20 ते 25 टक्के आमदारांची तिकिटे कापू शकते. यात अनेक ज्येष्ठ आमदारांचाही समावेश असू शकतो. यापूर्वी सोमवारीही अमित शाह यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक पार पडली होती. या बैठकीत गुजरात भाजपचे नेते सहभागी झाले होते.
यांना मिळू शकते तिकीट? -
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पटेल, अल्पेश, क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांना भाजपकडून तिकीट मिळू शकते. याशिवाय, सीएम भूपेन्द्र पटेल, गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी, स्वास्थ्य मंत्री ऋषिकेश पटेल, कुबेर डिंडोर, जीतू चौधरी, दिलीप ठाकोर, जयेश राडाडिया, ईश्वर पटेल, संगीता पाटिल, शंकर चौधरी, नरेश पटेल, जगदीश पांचाल यांना तिकीट मिळू शकते.