Gujarat Assembly Election 2022 : गुजरातमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला जोर; भाजपचे दिग्गज नेते पहिल्या टप्प्यातील प्रचारासाठी मैदानात!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:16 AM2022-11-19T11:16:41+5:302022-11-19T11:17:15+5:30
Gujarat Assembly Election 2022: भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी 40 जागांवर रिंगणात उतरले.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) पहिल्या टप्प्यातील प्रचार संपायला अवघे 10 दिवस उरले आहेत. अशा स्थितीत सत्ताधारी भाजपसह ( BJP ) सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. यासाठी भाजपने देशातील आणि राज्य पातळीवरील सर्व दिग्गज नेत्यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी कामाला लावले आहे.
भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसह भाजपचे राष्ट्रीय नेते शुक्रवारी 40 जागांवर रिंगणात उतरले. जेपी नड्डा यांच्यासह सुमारे 15 राष्ट्रीय भाजप नेत्यांनी 40 हून अधिक जाहीर सभांना संबोधित केले. या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अनुराग ठाकूर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. याशिवाय, भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या आणि लडाखचे भाजप खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनीही गुजरातमध्ये भाजपचा प्रचार केला.
विशेष म्हणजे, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने याला 'कार्पेट बॉम्बिंग' म्हटले आहे. प्रचारासाठी नेत्यांच्या क्षेत्रांची काळजीपूर्वक निवड करण्याकडे लक्ष वेधून भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, "2012 पासून आम्ही राष्ट्रीय नेत्यांना आणण्याची ही रणनीती लागू केली आहे, ज्यांनी आपल्या राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे." दरम्यान, पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबर 2022 रोजी 89 जागांवर मतदान होणार आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान
गुजरात विधानसभेच्या सर्व 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान होणार आहे. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. गेल्या 27 वर्षांपासून राज्यात भाजपची सत्ता असून, भाजप सत्ता कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर, काँग्रेस आणि आपही भाजपची सत्ता उलथून टाकण्याच्या प्रयत्नात आहे.