गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात ६८ टक्के मतदान, अनेक ठिकाणी ईव्हीएमविषयी तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:22 AM2017-12-10T05:22:49+5:302017-12-10T05:23:15+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ८९ मतदारसंघांत शनिवारी ६८ टक्के मतदान झाले असून, त्याचा फायदा काँग्रेसला होतो की भाजपाला मिळतो, याची उत्सुकता आहे. याआधी २0१२ च्या निवडणुकीत ७0.७४ टक्के मतदान झाले होते.
मात्र सुरुवातीच्या काही तासांतच मतदान यंत्रांबाबत अनेक तक्रारी आल्या. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड, तर काही ठिकाणी छेडछाडीच्या तक्रारी मतदारांनी केल्या. अशा शंभरहून अधिक तक्रारी आल्या.
पोरबंदर येथील काँग्रेस उमेदवार अर्जुन मोधवाडिया यांनी ईव्हीएम ब्ल्यूटूथला जोडून हेराफेरी होत असल्याचा आरोप केला. यांनी निवडणूक आयोगाकडेही तशी तक्रार केली. सर्व ईव्हीएम ब्ल्यूटूथद्वारे तीन मोबाइलला जोडण्यात आले होते, असा आरोप त्यांनी केला. गुजरातचे मुख्य निवडणूक अधिकारी बी. बी. स्वाइन यांनी सांगितले की, अर्जुन मोधवाडिया यांच्या तक्रारीनंतर तपासणीचे आदेश दिले आहेत.
मांडवीत काँग्रेस उमेदवार शक्तीसिंग गोहिल यांनीही ईव्हीएममधील बिघाडाच्या तक्रारी केल्या आहेत. ते म्हणाले, अनेक ठिकाणी ईव्हीएम योग्य प्रकारे काम करीत नसल्याच्या तक्रारी आल्या. जेतपूर मतदारसंघातील एका केंद्रात ईव्हीएम बिघाडामुळे मतदान १५ मिनिटे थांबवण्यात आले. राजकोट जिल्ह्यात ३३ ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारी आल्या.
मोदी-राहुल गांधी यांची परीक्षा
या निवडणुका म्हणजे लोकसभेच्या २०१९ मध्ये होणाºया निवडणुकांची चाचणी मानली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काँग्रेसचे अध्यक्ष होत असलेल्या राहुल गांधी यांच्यासाठी ही नेतृत्वाची परीक्षा आहे. मोदी यांनी सौराष्ट्र व दक्षिण गुजरातेत १५ सभा घेतल्या, राहुल गांधी सात दिवस राज्यात होते आणि अनेक सभांत भाषणे केली.
आज अनेक ठिकाणी विवाहसोहळे होते. त्यामुळे वधू-वर नटूनथटून मतदानाला आले होते. राजकोटमध्ये ११५ वर्षे वयाच्या महिलेने मतदान केले. उमेदवार व नेत्यांनी दुपारपर्यंत मतदान केले होते. मुख्यमंत्री विजय रुपानी, त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार इंद्रनील राजगुरू, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जीतू वाघाणी, क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा यांनी लवकरच मतदान केले. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री विजय रुपानी, काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल आणि परेश धनानी हे रिंगणात आहेत.
68% मतदानाचा फायदा भाजपाला की काँग्रेसला?
सौराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील ८९ जागांसाठी ९७७ उमेदवार रिंगणात. भाजपाने २०१२ मध्ये यातील ६३ जागा व काँग्रेसने २२ जागा जिंकल्या होत्या.