गुजरात निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का, कच्छच्या उमेदवाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:47 PM2022-11-28T12:47:28+5:302022-11-28T12:48:16+5:30
gujarat assembly election 2022 : आपचे उमेदवार वसंत वजलीभाई खेतानी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी तीन दिवस बाकी आहेत. मात्र त्याआधीच आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. आपचे उमेदवार वसंत वजलीभाई खेतानी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वसंत वजलीभाई खेतानी यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. वसंत वजलीभाई खेतानी म्हणाले, "मी कच्छ जिल्ह्यातील अबडासा विधानसभा मतदारसंघातून आपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होतो, पण आता त्यांनी भाजपचे उमेदवार प्रद्युमन सिंह जडेजा यांना पाठिंबा दिला आहे."
गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला विधानसभेच्या 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. यानंतर गुजरातमध्ये पुन्हा कोण सत्तेवर बसणार, हे स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस आणि आप हे तिन्ही पक्ष जोरदार निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. आपनेही 29 जागांवर नशीब आजमावले, पण एकाही जागेवर आपले खाते उघडता आले नाही. यंदाच्या निवडणुकीत आप जोरदारपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आप रामराम ठोकणाऱ्या वसंत वजलीभाई खेतानी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते कच्छ जिल्ह्यातील अबडासा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. या जागेवर भाजपतर्फे प्रद्युम्न सिंग जडेजा लढत आहेत. वसंत वजलीभाई खेतानी यांनी जनतेला भाजप उमेदवार प्रद्युम्न सिंह जडेजा यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. कच्छमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. कच्छ जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत, ज्यामध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेले अबडासा, भुज आणि रापर तसेच मांडवी, अंजार आणि गांधीधाम यांचा समावेश आहे.
अरविंद केजरीवालांचे भाकीत
गेल्या रविवारी अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीबाबत मोठे भाकीत केले होते. अरविंद केजरीवाल यांनी एका कागदावर लिहिले होते की, गुजरातमध्ये आपचे सरकार बनत आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू केली जाईल. आम्ही पंजाबमध्ये जुन्या पेन्शन योजनेची अधिसूचना जारी केली आहे. येथील पोलिस, शिक्षक, वाहतूक, अंगणवाडी सेविका, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आम्ही सर्वांच्या समस्या सोडवू, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले होते.
आरोपीच्या मुलीला भाजपचे तिकीट
गोधरा कांडाच्या वेळी नरोडा पाटिया कांडही चर्चेत राहिले. त्या केसमध्ये जामिनावर सुटलेले मनोज कुकराणी यांची डॉक्टर कन्या पायल कुकराणी या भाजप उमेदवार आहेत. त्या सर्वात तरुण उमेदवार आहेत. 1990 पासून भाजपने येथे पराभव पाहिलेला नाही. काँग्रेसने मेघराज डोडवाणी यांना उमेदवारी दिली आहे. सिंधी समाजाची मोठी मते इथे आहेत आणि हिंदी भाषकांचीही. आपने हिंदी भाषिक ओमप्रकाश तिवारी यांना उमेदवारी देत रंगत आणली आहे.
अमित शहा उमेदवार
अहमदाबादमधील एलिसब्रिज मतदारसंघात अमित शहा भाजपचे उमेदवार आहेत. केंद्रीय गृहमंत्री नव्हे तर हे आहेत अमित पोपटलाल शहा. ते पाचवेळा नगरसेवक, एकदा महापौरदेखील होते. 63 व्या वर्षी ते प्रचारात झपझप फिरतात. त्यांचा उदंड उत्साह हा चर्चेचा विषय आहे.