गुजरात विधानसभा निवडणूक : कुतियानामध्ये चर्चा बाहुबली उमेदवाराची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:50 AM2017-11-26T01:50:53+5:302017-11-26T01:51:13+5:30
हा गुजरातमधील असा एक मतदारसंघ आहे, जिथे ना चर्चा आहे भाजपाची ना काँग्रेसची. तिथे केवळ चर्चा आहे, बाहुबली नेता कंधल सरनमभाई जडेजा याची. हे जडेजा २0१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून विधानसभेवर निवडून आले होते.
- विकास मिश्र
कुतियाना : हा गुजरातमधील असा एक मतदारसंघ आहे, जिथे ना चर्चा आहे भाजपाची ना काँग्रेसची. तिथे केवळ चर्चा आहे, बाहुबली नेता कंधल सरनमभाई जडेजा याची. हे जडेजा २0१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवून विधानसभेवर निवडून आले होते.
अर्थात त्यांना रोखणार तरी कोण? इथे केवळ त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचाच बोलबाला आहे. त्यांची आई आणि गुजरातची डॉन संतोकबेन आता या जगात नाहीत. पण जाताना त्यांनी जणू आपली सारी ताकद कंधललाच दिली आहे. कंधल जडेजाचे वडील सरनमभाई एक मिल मजदूर होते. पण एका हत्याकांडामुळे ते बाहुबली बनले. नंतर त्यांचीही हत्या झाली. त्यावेळी संतोकबेन गृहिणी होत्या. पण १९८६ साली पतीची हत्या झाल्याने त्या भयंकर संतापल्या आणि तेव्हापासून पोरबंदरमध्ये त्यांचे (गैर)शासन सुरू झाले. त्या १९९0 व १९९५ साली कुतियानामधून निवडूनही आल्या. त्यांच्यावर एक चित्रपटही बनला होता आणि संतोकबेनची भूमिका शबाना आझमी यांनी केली होती. कंधल आईसारखे मोठा डॉन बनू शकले नाहीत, पण लोकच त्यांना बाहुबली मानत आहेत. त्यांनीही तुरुंगाची हवा खाल्ली आहे. त्यांनी २0१२ साली भाजपाचे करसनभाईना १९ हजार मतांनी पराभूत केले होते आणि यंदाही त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. कांग्रेसचे वेजरभाई मोडेदरा व भाजपाचे लखमण ओडेदरा मैदानात आहेत.
अंबानींच्या गावात काँग्रेसची हवा
मंगरोल मतदारसंघातील बाजारात थांबलो असताना चहाच्या टपरीवर निवडणुकीची चर्चा सुरू झाली. या गावाचे नाव काय, असा प्रश्न विचारताच, सुरेशभाई नावाचे गृहस्थ उत्तरले की, हे चोरवाड आहे. चोरवाड म्हणजे धीरूभाई अंबानी यांचे गाव. कधीकधी कोकिळाबेन अंबानी इथे येतात, असेही समजले. गावात कोणत्या पक्षाचा जोर आहे, असा सवाल करताच, तिथे काँग्रेसचाच बोलबाला असल्याचे जाणवले.
पाच वर्षांत संपत्ती चौपट
पोरबंदरमध्ये काँग्रेसचे अर्जुनभाई मोडवादिया यांची जोरात चर्चा आहे. ते सलग दोनदा पराभूत झाले. तरीही त्यांची मालमत्ता प्रचंड वाढली आहे.
निवडणूक आयोगापुढे २00७ साली त्यांनी आपली संपत्ती १ कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजे २0१२ साली ती ४ कोटी झाली आणि आता २0१७ साली ती आणखी वाढली आहे.
ती किती वाढली, यातच मतदारांना रस दिसत आहे. त्यांच्याविरोधात भाजपाचे बाबूभाई बोखारिया मैदानात आहेत. पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्यासाठी अर्जुनभाई प्रयत्नशील आहेत.