गुजरात विधानसभा निवडणूक : शिवसेनेमुळे दोन मतदारसंघांत रंग
By संदीप प्रधान | Published: December 3, 2017 01:24 AM2017-12-03T01:24:29+5:302017-12-03T03:54:20+5:30
महाराष्ट्रात रोज भाजपाची डोकेदुखी वाढवणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये ४८ जागांवर उमेदवार उभे केले असले तरी सुरत व साबरमती येथील एकेका जागेवरील उमेदवारांच्या ताकदीमुळे शिवसेना लढतीत आली आहे. सुरतच्या लिंबायत विधानसभा मतदारसंघातून सम्राट पाटील रिंगणात असून त्यांनी शिवसेनेला चर्चेत आणले आहे.
सुरत : महाराष्ट्रात रोज भाजपाची डोकेदुखी वाढवणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये ४८ जागांवर उमेदवार उभे केले असले तरी सुरत व साबरमती येथील एकेका जागेवरील उमेदवारांच्या ताकदीमुळे शिवसेना लढतीत आली आहे. सुरतच्या लिंबायत विधानसभा मतदारसंघातून सम्राट पाटील रिंगणात असून त्यांनी शिवसेनेला चर्चेत आणले आहे.
सम्राट यांचे बंधू सुनील सुरत भाजपाचे उपाध्यक्ष होते. सम्राट यांनी बंडखोरी केल्यावर भाजपाने सुनील यांची पक्षातून हकालपट्टी केली. सम्राट यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपा खासदार सी. आर. पाटील यांनी प्रयत्न केले. खा. पाटील यांची सून संगीता यांचे भवितव्य या ठिकाणी पणाला लागले आहे. सम्राट बधत नाही हे पाहिल्यावर ‘मातोश्री’वरुन सम्राट यांचे तिकीट कापण्याकरिता प्रयत्न केल्याचा सुनील पाटील यांचा आरोप आहे. खा. पाटील आणि सम्राट पाटील हे दोघेही मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत. चार लाख लोकवस्तीच्या लिंबायतमध्ये २ लाख ५८ हजार मतदार असून, त्यापैकी ८५ हजार मराठी मतदार आहेत. लिंबायतमधील मराठी मतदारांच्या पाठिंब्यामुळेच खा. पाटील सातत्याने विजयी होत आहेत. त्यामुळे सम्राट यांची बंडखोरी दोन वर्षांनी होणाºया लोकसभा निवडणुकीत खा. पाटील यांच्यासाठी डोकेदुखी आहे. आतापर्यंत लिंबायत मतदारसंघात एकाचवेळी चार मराठी उमेदवार उभे करून काँग्रेस आणि चार मुस्लीम उमेदवार उभे करून भाजपा मतविभाजन करीत आली आहे. यावेळी भाजपाला एकटे पाडण्यासाठी काँग्रेस, शिवसेना, हार्दिक पटेल यांनी जेथे ज्याचा प्रभावी उमेदवार आहे तेथे दुस-याने एकाच धर्म, जात अथवा भाषेचा उमेदवार देण्याचे टाळले आहे. या अप्रत्यक्ष समझोत्यामुळे निवडणूक रंगतदार झाली आहे. लिंबायतमधील ७५ हजार मुस्लीम मतेही निर्णायक अशीच आहेत.
लिंबायतमध्ये इस्पितळ, कॉलेज, उद्यान आदी कुठल्याच सुविधा नाहीत. खा. पाटील व त्यांची आमदार सून यांनी त्यासाठी काहीच न केल्याने शिवसेनेने हाच मुद्दा केला आहे. भाजपाने पूर्णपणे सोडून दिलेला हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेने प्रचारात आणला आहे.
सुरतच्या १२ विधानसभा मतदारसंघांपैकी एक जागा भाजपाने उत्तर भारतीयांसाठी सोडावी, अशी मागणी येथील उत्तर भारतीयांनी केली होती. मात्र भाजपाने एकही जागा सोडली नाही. काँग्रेसने मजूरा मतदारसंघातून अशोक कोठारी यांना उमेदवारी दिली.
उत्तर प्रदेशातील ३ ते ४ लाख कामगार सुरत परिसरात मोलमजुरी करतात. त्यांच्यामध्ये यामुळे नाराजी आहे. भाजपाने उमेदवारी न
दिल्याचा वचपा काढण्याचा सूर उत्तर भारतीय मतदारांमध्ये आहे, असे गुजराती व्यापारी सांगतात. उत्तर भारतीयांचे हे वर्चस्व हेरून भाजपाने दक्षिण गुजरातमधील प्रचाराची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर
सोपवली आहे.
ठाकरे येणार नाहीत?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुजरातमध्ये प्रचाराला यावे यासाठी काही उमेदवार प्रयत्न करीत आहेत. ठाकरे प्रचाराला आले तर लिंबायतची जागा शंभर टक्के निघेल, असा दावा पाटील करतात. मात्र उद्धव यांच्या गुजरात प्रचाराची शक्यता अत्यंत धूसर आहे. येथे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी जराही नाही. उद्धव येऊन सर्व जागा पडल्या तर त्यामुळे त्यांचीच नाचक्की होईल.
जबरदस्त आकर्षण
शिवसेनेने कच्छ, सौराष्ट्र, सुरत, अहमदाबाद, बडोदा, जामनगर अशा सर्व ठिकाणी मिळून ४८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. गुजरातमध्ये भक्कमपणे पाय रोवण्याची शिवसेनेची तयारी सुरू आहे. भाजपाने हिंदुत्व सोडले असले तरी शिवसेनेने हिंदुत्व सोडले नसल्याने लोकांमध्ये शिवसेनेचे जबरदस्त आकर्षण आहे.
-हेमराज शहा, संघटक, शिवसेना