गुजरात विधानसभा निवडणूक : आयाराम-गयारामांना महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:24 AM2017-12-13T01:24:05+5:302017-12-13T01:24:20+5:30
आपल्याच पक्षातील असंतुष्टांमुळे त्रस्त असलेल्या भाजप आणि काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या बंडखोरांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीत यंदा आयाराम-गयारामांना महत्त्व आले.
- महेश खरे
सुरत : आपल्याच पक्षातील असंतुष्टांमुळे त्रस्त असलेल्या भाजप आणि काँग्रेसने संधी मिळेल तेव्हा एकमेकांच्या बंडखोरांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच गुजरात निवडणुकीत यंदा आयाराम-गयारामांना महत्त्व आले. आपल्या पक्षाकडून तिकीट मिळाले नाही म्हणून काही असंतुष्टांनी दुस-या पक्षांकडून तिकीट मिळविल्याचे दिसते. काही नेत्यांनी आपल्या पक्षाकडे तिकीट तर मागितलेच, पण दुस-या पक्षाच्या नेत्यांशी संपर्क ठेवला. जेव्हा आपल्या पक्षाने तिकीट नाकारले तेव्हा हे नेते दुस-या पक्षाचे तिकीट घेऊन मैदानात उतरले.
भाजपने दिले तिकीट
काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेत्यांनी भाजपला जवळ केले. काँग्रेसच्या दहापेक्षा अधिक नेत्यांना भाजपने तिकीट दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत तर काँग्रेसने आपल्या आमदारांना गुजरातहून कर्नाटकात नेले होते. त्यावेळी पक्ष बदलून आलेल्या सर्व आमदारांना भाजपने आपल्या यादीत स्थान दिले. काल जे काँग्रेससाठी समर्थन मागत होते ते आज स्वत: आणि भाजपसाठी मते मागताना दिसत आहेत. राष्ट्रवादीनेही दुसºया पक्षातील तिकिटापासून वंचित नेत्यांना स्वीकारण्यास वेळ लावला नाही. राष्ट्रवादीच्या प्रमुख उमेदवारांत सावलीतून खुमान सिंह चौहान, बनासकांठामधून बहादूर भाई, चालसा येथून दिनेश ठाकोर, मोखामधून भूपत सिंह, थरा येथून मावजी भाई, रापरमधून बाबू मेघजी शाह यांचा समावेश आहे.
भाजप सोडून झाले अपक्ष उमेदवार
भाजपच्या तिकिटापासून वंचित राहिलेले काही नेते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. यात लालजी मेर, कमा राठोड, धर्मेंद्र सिंह वाघेला (वाघोडिया), जसवंत सिंह परमार, चेतन पटेल, खुमान सिंह, सुनील पटेल यांचा समावेश आहे. सुरतच्या लिंबायत भागातून डॉ. रवींद्र पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर ते काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. भाजपच्या उमेदवार संगीता पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याच्या निर्णयाबाबत ते ठाम राहिले.
असंतुष्ट ठरले अडथळा
गुजरात विधानसभा निवडणुकीत असंतुष्ट उमेदवार क ाँग्रेस आणि भाजपच्या अधिकृत उमेदवारांसाठी समस्या बनले आहेत. चौर्यासी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अजय चौधरी भाजपचे महामंत्री राहिलेले आहेत. पण, पक्षाने त्यांना संधी न दिल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. दक्षिण आणि उत्तर गुजरातमध्ये असंतुष्टांची संख्या मोठी आहे.