Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला? कच्छ-सौराष्ट्रमध्ये दिसला असा ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 11:29 AM2022-12-02T11:29:19+5:302022-12-02T11:30:08+5:30
Gujarat Assembly Election 2022: आधीच्या निवडणुकांप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. काल ८९ जागांसाठी ६०.२० टक्के मतदान झाले. तर २०१७ मध्ये या जागांवर तब्बल ६८ टक्के मतदान झाले होते.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात १९ जिल्ह्यातील ८९ जागांवर मतदान झाले. त्यात सुमारे ७८८ मतदारांच्या भविष्याचा फैसला ईव्हीएममध्ये कैद झाला आहे. मात्र आधीच्या निवडणुकांप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. काल ८९ जागांसाठी ६०.२० टक्के मतदान झाले. तर २०१७ मध्ये या जागांवर तब्बल ६८ टक्के मतदान झाले होते.
सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील ट्रेंड पाहिल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ८ टक्के मतदान कमी झाले आहे. तर २०१२ मध्ये ७०.७५ टक्के मतदान झाले होते. अशाप्रकारे गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. यावेळी गुजरातमध्ये भाजपासमोर काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाने आव्हान उभे केल्याने तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१७ च्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई होती. त्यात सौराष्ट्र कच्छ भागात काँग्रेस वरचढ ठरली होती. तर दक्षिण गुजरातमध्ये भाजपाने क्लीन स्विप केली होती. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यातील ८९ जागांपैकी भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३९ जागा जिंकल्या होत्या. बीटीपीने २ तर एनसीपीने एक जागा जिंकली होती. तर २०१२ मध्ये भाजपाने ८९ जागांपैकी ६३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने. २२ आणि इतरांनी चार जागा जिंकल्या होत्या.