Gujarat Assembly Election: केजरीवालांची मोठी खेळी; गुजरात निवडणुकीसाठी आपकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 03:13 PM2022-11-04T15:13:23+5:302022-11-04T15:14:57+5:30
Gujarat Assembly Election 2022: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मोठी खेळी करत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी Isudan Gadhvi यांचं नाव आपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.
अहमदाबाद - यावर्षीच्या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. गुजरातमध्येआपला मिळत असलेल्या जोरदार प्रतिसादामुळे राज्यातील मुख्य पक्ष असलेल्या भाजपा आणि काँग्रेसचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल मोठी खेळी करत गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ईसुदान गढवी यांचं नाव आपकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.
अरविंद केजरीवाल यांनी २९ ऑक्टोबर रोजी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते मुख्यमंत्री म्हणून कुणाला पाहू इच्छितात असा प्रश्न जनतेला विचारला होता. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी पाटीदार नेते गोपाल इटालिया, अल्पेश कथेरिया, काँग्रेसमधून आपमध्ये आलेले इंद्रनील राज्यगुरू, मनोज सुरथिया यांची नावे चर्चेत होती. मात्र अरविंद केजरीवाल यांनी जनतेकडून मागवलेल्या अभिप्रायानुसार माजी पत्रकार ईशूदान गढवी यांच्या नावाची घोषणा केली होती.
आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, गुजरातमधील सुमारे १६ लाख लोकांकडून मतं मागवण्यात आली होती, त्याआधारावर ही निवड करण्यात आली आहे. आता आमच्या पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेच असतील. ॉ
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, टाइम्स नाऊ-नवभारत आणि ईटीजीचं गुजरातबाबतचं ओपिनियन पोलसमोर आलं आहे. या ओपिनियन पोलमधून गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार बनेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र गुजरातमध्ये यावेळी आम आदमी पक्ष जोरदार मुसंडी मारेल, असा दावा या ओपिनियन पोलमधून करण्यात आला आहे.