Gujarat Election Result 2022 Live: 'दिल्ली तुम्ही घ्या नि गुजरात आम्हाला द्या', BJP - AAP ची 'डील'; Sanjay Raut यांचा घणाघाती आरोप!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:56 AM2022-12-08T10:56:39+5:302022-12-08T10:57:08+5:30
काँग्रेसच्या पराभवाशी राहुल गांधीच्या 'भारत जोडो'शी संबंध लावणं चुकीचं, असंही राऊत म्हणाले
Sanjay Raut reaction on Gujarat Election Result 2022 Live: कोरोनाचा विळखा कमी होताच, हळूहळू ठिकठिकाणी निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. काल दिल्लीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले. त्यात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला एकहाती विजय मिळाला. भाजपाला तेथे आपला प्रभाव दाखवता आला नाही. पण दुसरीकडे, भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या गुजरात विधानसभेत मात्र सलग सातव्यांदा भाजपानेच बाजी मारली. भाजपाची विजयाकडे वाटचाल सुरू असताना शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र भाजपा आणि आप या दोन पक्षांना खोचक टोला लगावला. दोन पक्षांनी आपसांत 'डील' केल्याचा आरोप त्यांनी केली.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने इतर पक्षांसोबत चर्चा करून सामंजस्याने निवडणूक लढवायला हवी होती. पण बहुतेक दिल्ली तुम्ही घ्या आणि भाजपा आम्हाला द्या अशा पद्धतीचे 'डील' झाले असावे अशी लोकांना शंका असल्याचा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केला. "तीन प्रमुख निवडणुकांमध्ये दिल्ली भाजपाच्या हातून गेलं, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने टक्कर दिल्याने भाजपाला संघर्ष करावा लागतोय तर गुजरात मध्ये बाजी त्यांची आहे. आम्ही तिनही पक्षांचे अभिनंदन करतो. पण ज्याप्रकारचे निकाल आले आहेत, त्यात दोन पक्षांमध्ये 'डील' झाली होती की काय, असा संशय लोकांना येऊ लागलाय," असं रोखठोक मत राऊतांनी मांडले.
तर २०२४ मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही!
हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल. देशाच्या पुढील निवडणुकीत आशादायक चित्र आहे. पण विरोधकांनी मतविभागणी टाळणं गरजेचे आहे. तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. गुजरात निकालाचा संदर्भ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेशी लावणं चुकीचे आहे. राहुल गांधी काँग्रेस अंतर्गत राजकारणापासून लांब आहे. देश जोडणे, लोकांची मने जोडणे, संघर्ष थांबवणे यासाठी राहुल गांधींनी यात्रा सुरू आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाशी राहुल गांधींना जोडणे योग्य नाही असं सांगत गुजरात निकालावरून राहुल गांधींना टार्गेट करणे योग्य नाही असे राऊत म्हणाले.