गुजरात विधानसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 06:46 PM2017-12-09T18:46:45+5:302017-12-09T20:56:11+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपली. पहिल्या टप्प्यात गुजरातमध्ये 68 टक्के मतदान झाले अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बी.बी.स्वॅन यांनी दिली. गुजरात विधानसभेमध्ये एकूण 182 जागा आहेत.
कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. दुस-या टप्प्यासाठी 14 डिसेंबरला मतदान होणार असून, 18 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. शनिवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही मतदान केंद्रांवरुन ईव्हीएम मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
या ठिकाणची मतदान यंत्रे बदलण्यात आली. काँग्रेसने काही ईव्हीएममशीन मोबाइलमधल्या ब्लू टुथला जोडली असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने हा आरोप फेटाळून लावला. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. या परिक्षेत पंतप्रधान कोण पास होते, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सुरु झालं होतं.
Gujarat: First phase of polling ends in the state, visuals from Bhavnagar #GujaratElection2017pic.twitter.com/KzfWp6VTVJ
— ANI (@ANI) December 9, 2017
पहिल्या टप्प्यात एकूण 89 जागा असून त्यांतील 53 जागा या ग्रामीण भागतील आहेत तर 36 जागा या शहरी भागातील आहे. सध्या ग्रामीण भागातील 53 जागांपैकी भाजपकडे 32 आणि काँग्रेसकडे 17 जागा आहेत. तर शहरी भागातील 36 जागांपैकी भाजपकडे तब्बल 31 आणि काँग्रेसकडे फक्त 5 जागा आहेत.
#Visuals from Rajkot: EVMs & VVPATs being sealed after first phase of polling ends in #GujaratElection2017pic.twitter.com/3MBIGuVL42
— ANI (@ANI) December 9, 2017
राज्यातील गेल्या तीन विधानसभा निवडणुका (2002, 2007 आणि 2012) भाजपाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली लढवल्या व बहुमत मिळवलं. यंदा काय होतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.एकीकडे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरुन पंतप्रधानपदापर्यंत प्रवास केलेले नरेंद्र मोदी आहेत, तर दुसरीकडे आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणारे राहुल गांधी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गड राहुल गांधी सर करणार का ? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
राहुल गांधी आता अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणं फारच महत्वाचं आहे. आपल्याला सिद्ध करण्याची ही अजून एक संधी त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे सलग 22 वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा सत्तेवर येणं तितकंच महत्वाचं आहे. तसं न झाल्यास मोदींच्या तुलनेत राहुल गांधींचं राजकीय वजन वाढेल यामध्ये काही दुमत नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष ही निवडणूक जिंकण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत.