गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो; मोदींच्या मतदारसंघात लागले पोस्टर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 05:26 PM2018-10-09T17:26:33+5:302018-10-09T17:28:30+5:30
पोस्टरमधून गुजराती, मराठी भाषिकांना बनारस सोडण्याचा इशारा
वाराणसी: गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवरील वाढत्या हल्ल्यांवरुन आता राजकारण तापलं आहे. गुजरातमध्येबिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांवर हल्ले होत आहेत. याचे पडसाद आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत उमटले आहेत. वाराणसीत ठिकठिकाणी 'गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोड़ो' असा मजकूर असलेले पोस्टर लावण्यात आले आहेत. गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांचा उत्तर प्रदेशात निषेध करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केला. यानंतर स्थानिकांनी उत्तर भारतीयांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीय बिहार आणि उत्तर प्रदेशात परतले. गुजरातमध्ये होत असलेल्या या हल्ल्यांचा यूपी-बिहार एकता मंचानं निषेध केला आहे. यासाठी त्यांनी वाराणसीतील अनेक भागांमध्ये मोदीविरोधी पोस्टर लावले आहेत.
यूपी-बिहार एकता मंचानं पोस्टरमधून थेट पंतप्रधान मोदींना इशारा देण्यात आला आहे. 'गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात बनारसमधून ऐलान-ए-जंग' असा मजकूर या पोस्टरवर आहे. यामधून बनारसमधील गुजराती आणि मराठी भाषिकांना निर्वाणीचा इशारा दिला गेला आहे. 'बनारसमध्ये वास्तव्यास असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्राच्या लोकांनी आठवड्याभरात बनारस सोडून जावं. अन्यथा परिणामांना सामोरं जाण्यास तयार रहावं,' असा मजकूर पोस्टरवर आहे.