“BJP कार्यकर्त्याला नोकरीची चिंता नको, आरामात मिळेल”; गुजरातमधील नेत्याचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 08:59 AM2021-10-13T08:59:17+5:302021-10-13T09:01:28+5:30
गुजरातमध्ये सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे.
अहमदाबाद: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध पक्षातील नेत्यांच्या अनेक खळबळजनक आणि वादग्रस्त विधानांमुळे राजकीय वर्तुळ ढवळून निघत आहे. यामुळे आरोप-प्रत्यारोपांना पूर आल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये सरकारीनोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातच गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मोठे विधान केले असून, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलांनी नोकरीची अजिबात चिंता करू नये, ती त्यांना आरामात मिळेल. भाजपचेच सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांना मागे ठेवणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील साबरकांठा येथील हिम्मतनगर येथे बोलताना सीआर पाटील यांनी सदर विधान केले आहे. भाजप कार्यकर्त्याला सहजपणे नोकरी मिळू शकेल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, तो भाजपचा कार्यकर्ता असायला हवा, हे निश्चित, असे पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
भाजपचेच सरकार आहे, कार्यकर्ता मागे राहणार नाही
आमच्या एका जिल्हा प्रभारींनी एका व्यक्ती कडाक्याच्या थंडीतून जाताना दिसली. त्यांनी हटकून विचारले असता पेज कमिटीचा तपशील देण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हा प्रभारी त्यांना माझ्याकडे घेऊन आले. ती व्यक्ती म्हणाली की, गेल्या २० वर्षांपासून मी भाजपसाठी काम करतोय. एक गोष्ट विचारायची होती. पण ती सांगावी का याबाबत द्विधा मनःस्थिती आहे. कशी विचारावी याबाबत संकोच वाटतोय, यावर त्या व्यक्तीला मोकळेपणाने बोलायला सांगितल्यावर तो कार्यकर्ता म्हणाला की, माझ्या मुलाला नोकरी मिळत नाही. अनेक ठिकाणी प्रयत्न करून झाले. मात्र, या भेटीनंतर त्याच्या मुलाला नोकरी लागली. भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला पाठी ठेवणार नाही. कार्यकर्त्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे, असा आग्रह धरण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसचे टीकास्त्र
सीआर पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. केवळ भाजपचा कार्यकर्ता आहे, या निकषावर नोकऱ्या देणे चुकीचे आहे. नोकरी देताना क्वालिफिकेशन, क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे. अशाने नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या योग्य उमेदवारांवर अन्याय होतो, असे काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर भाजप कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांच्या नोकरीसाठी सीआर पाटील यांना फोन करावा, असा खोचक सल्लाही दिला.