'चौकीदारा'चा मुलगा निघाला कॉपीबहाद्दर; भाजपा प्रदेश अध्यक्षाच्या मुलाकडे सापडल्या 27 चिठ्ठ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 07:48 AM2019-03-29T07:48:49+5:302019-03-29T07:56:22+5:30
बीसीएच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा देताना कॉपी करताना सापडला
गांधीनगर: गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वाघानी यांचं नाव अचानक चर्चेत आलं आहे. वाघानी यांच्या मुलाला परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आलं. बॅचलर्स ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशनची (बीसीए) परीक्षा देणाऱ्या वाघानी यांचा मुलगा मीतकडे 27 चिठ्ठ्या सापडल्या. यामध्ये विविध प्रश्नांची उत्तरं होती.
मीत वाघानीसह चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आलं. मात्र याबद्दलची माहिती देताना भावनगर कॉलेजचे मुख्याध्यापक वाटलिया यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 'आम्ही चार विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलं. यामध्ये गुजरात भाजपा अध्यक्ष जीतू वाघानी यांचा मुलगा कोण आहे, याबद्दलची माहिती आमच्याकडे नाही,' असं वाटलिया म्हणाले. याबद्दल बोलताना मुलावर योग्य ती कारवाई होईल, असं वाघानी म्हणाले. 'मीतला परीक्षेत कॉपी करताना पकडण्यात आलं. त्यावर विद्यापीठ योग्य ती कारवाई करेल,' असं वाघानी यांनी सांगितलं.
मीत वाघानी भावनगर विद्यापीठात परीक्षा देत होता. त्यावेळी निरीक्षकांना त्याच्याकडे 27 चिठ्ठ्या सापडल्या. मीत वाघानी एम. जे. सी. सी महाविद्यालयात बीसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार असलेले जीतू वाघानी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे 'चौकीदार' लावतात. आता या चौकीदाराच्या मुलावर विद्यापीठ नेमकी काय कारवाई करणार, याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.