गुजरात भाजपाचा पद्मावती सिनेमाला कडाडून विरोध, निवडणुकीनंतर सिनेमा प्रदर्शित करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 11:26 AM2017-11-02T11:26:41+5:302017-11-02T11:29:42+5:30
दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाच्या मार्गातील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
अहमदाबाद- दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमाच्या मार्गातील अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पद्मावती सिनेमाला गुजरातमध्ये असलेला विरोध थांबताना दिसत नाही. नेते शंकर सिंह वाघेला यांच्यानंतर आता भाजपाने सिनेमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी तो राजपूत प्रतिनिधिंना दाखविला जावा, अशी मागणी भाजपाने निवडणूक आयोग आणि गुजरात मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. राजपूत प्रतिनिधींना सिनेमा दाखविला तर सिनेमावरील त्यांचा रोष कमी होईल तसंच आगामी गुजरात निवडणुकांच्यावेळी कुठलीही तणावपूर्ण परिस्थिती उद्भवणार नाही, असं गुजरात भाजपाने पत्रात म्हंटलं आहे.
पद्मावती सिनेमा गुजरात निवडणुकीनंतर गुजरातमध्ये प्रदर्शित करा किंवा सिनेमाला बॅन करा, असं मत भाजपाचे प्रवक्ते आणि राजपूर नेता आय.के जडेजा यांनी केली आहे. क्षत्रिय, राजपूत प्रतिनिधींनी मला भेटून सिनेमात कुठल्याही प्रकारे इतिहास आणि राणी पद्मावतीच्या चारित्र्याविषयी छेडछाड करणाऱ्या मुद्द्यांना विरोध केला आहे. इतिहासानुसार राणी पद्मावती कधीही अलाऊद्दीन खिलजीला भेटली नव्हती, असं राजपूत प्रतिनिधींनी सांगितल्याचं आय.के.जडेजा यांनी म्हंटलं. गुजरातच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. अशातच सिनेमात दाखविण्यात आलेलं कथानक हे तथ्याला धरून असावं, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडाछाड नसावी ज्यामुळे राजपूत, क्षत्रिय समुदायाच्या भावना दुखावल्या जातील.
पद्मावती सिनेमा 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे गुजरात निवडूक 9 डिसेंबरला असून 14 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे. जडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत समुदायाचे नेते केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि सेन्सॉर बोर्डाला भेठून सिनेमात दाखविण्यात आलेल्या कथेमुळे सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करतील.
गुजरात मल्टिप्लेक्स मालक असोसिएशनला जवळपास 10 दिवस आधीच श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेकडून पत्र मिळालं. संजय लिला भन्साळी यांच्या पद्मावती या सिनेमात हिंदू आणि राजपूत समुदायाच्या इतिहासात छेडछेडा केली आहे. जर गुजरातमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल. मल्टिप्लेक्सच्या संपत्तीचं नुकसानही होऊ शकतं, असं राजपूत कर्णी सेनेने पत्रात लिहिलं आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून एक महिना बाकी असून असे वाद सोडवले जातात, असं असोसिएशनचे अध्यक्ष मनुभाई पटेल यांनी म्हंटलं.
दरम्यान, याआधी शंकर सिंह वाघेला यांनी गुजरातमध्ये सिनेमाचं प्री-स्क्रीनिंग करून मग सिनेमा प्रदर्शित करावा, असं म्हंटलं होतं. प्री-स्क्रीनिंग न करता जर सिनेमा प्रदर्शित केला तर राज्यात हिंसक आंदोलन करू, असं वाघेला यांनी म्हंटलं होतं.