गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली - ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 08:50 AM2017-12-19T08:50:25+5:302017-12-19T08:56:36+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे.
अहमदाबाद - गुजरात निवडणुकीत झालेला भाजपाचा विजय हा जातीवाद आणि वंशवादाचा पराभव असल्याचं भाजपाध्यक्ष अमित शहा बोलले आहेत. दुसरीकडे काँग्रेसला मिळालेलं यश पाहता विरोधकांच्या चेह-यावर हसू उमटलं आहे. गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर अनेक राजकीय पक्ष आणि प्रमुखांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही टीका करताना गुजरात निकालाने मांजराच्या गळ्यात घंटा बांधली असा टोला भाजपाला लगावला आहे.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट केलं आहे की, 'संतुलित निकाल दिल्याबद्दल मी गुजरातच्या जनतेचं अभिनंदन करते. हा भाजपाचा तात्पुरता विजय असून त्यांचा नैतिक पराभव आहे. गुजरातमधील जनतेने अत्याचार, भीती आणि सामान्यांसोबत झालेल्या अन्यायाविरोधात मतदान केलं आहे. गुजरातने 2019 च्या निवडणुकीसाठी मांजराच्या गळ्यात घंटा बांधली आहे'.
I congratulate Gujarat voters for their very balanced verdict at this hour.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) December 18, 2017
It is a temporary and face-saving win, but it shows a moral defeat for BJP.
Gujarat voted against atrocities, anxiety and injustice caused to the common people. Gujarat belled the cat for 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले असून, हिमाचल प्रदेश मात्र काँग्रेसने आपल्या हातातून गमावले आहे. मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.
हिमाचल प्रदेशात मात्र काँग्रेसचे पानिपतच झाले. तेथील ६८ जागांपैकी ४४ जागा जिंकून देशातील आणखी एक राज्य भाजपाने आपल्याकडे खेचले आहे. देशातील १३ राज्यांत आता भाजपाची स्वबळावर सत्ता असेल. महाराष्ट्र, बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये मित्रपक्षांसमवेत भाजपा सत्तेवर असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे १६ राज्ये आहेत. हे घवघवीत यश मिळवताना मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार प्रेमकुमार धुमल पराभूत झाले. पक्षासाठी हा मोठा धक्का असून, तिथे पक्षाला नवा नेता शोधावा लागणार आहे.
जनतेच्या अधिकाराची लढाई सुरुच राहणार
गुजरात निवडणुकीत महत्वाचा चेहरा ठरलेल्या हार्दीक पटेलने आपली लढाई अजूनही सुरुच राहणार असल्याचं ट्विट केलं आहे. हार्दीकने ट्विट केलं आहे की, 'जनतेच्या अधिकाराची लढाई सुरुच राहील. आरक्षण, शेतकरी आणि तरुणांची लढाई. आम्ही प्रामाणिकपणा आणि सत्याच्या आधारे लढू. जो लढेल तोच जिंकेल. इन्कलाब जिंदाबाद'. दुस-या ट्विटमध्ये हार्दीकने लिहिलं आहे की, 'मी भाजपाला त्यांच्या विजयासाठी अभिनंदन करणार नाही, कारण त्यांनी दगाफटका करत विजय मिळवला आहे. गुजरातमधील जनता जागरुक झाली आहे, पण अजून जागरुक होण्याची गरज आहे. एव्हीएमसोबत छेडछाड झाली आहे हे सत्य आहे'.
हार्दिक नहीं हारा,बेरोज़गारी हारी है,शिक्षा की हार हुवी है,स्वास्थ्य की हार हुवी है,किसान की नमी आँख हारी हैं।आम लोगों से जुड़ा हर मुद्दा हारा है एक उम्मीद हारी हैं।सच कहु तो गुजरात की जनता हारी हैं EVM की गरबडी जीत गई हैं। pic.twitter.com/Do1J89Pcmh
— Hardik Patel (@HardikPatel_) December 18, 2017