अवघ्या 9 रुपयांसाठी बस कंडक्टरला बसणार 15 लाखांचा फटका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 17:22 IST2019-07-29T17:19:26+5:302019-07-29T17:22:59+5:30
चुकीच्या पद्धतीने पैसे कमवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाने चौकशी समिती नेमली होती.

अवघ्या 9 रुपयांसाठी बस कंडक्टरला बसणार 15 लाखांचा फटका!
अहमदाबाद : गुजरात राज्य परिवहन मंडळाच्या अंतर्गत काम करणाऱ्या एका बस कंडक्टरला लहान चूक मोठी महागात पडली आहे. एका बस प्रवाशाला तिकीट न देता फक्त 9 रुपये चुकीच्या पद्धतीने कमावल्याप्रकरणी कंडक्टरला आपल्या पगारातून जवळपास 15 लाख रुपयांचा फटका बसणार आहे.
चंद्रकांत पटेल असे या कंटक्टरचे नाव आहे. चुकीच्या पद्धतीने पैसे कमवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर राज्य परिवहन मंडळाने चौकशी समिती नेमली होती. या समितीत चंद्रकांत पटेल दोषी आढळले. यानंतर राज्य परिवहन मंडळाने चंद्रकांत पटेल यांना दंड म्हणून सध्याच्या पगारातील दोन स्टेज कमी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पे-स्केल भरपूर कमी झाला आहे. तसेच, त्यांनी एका निर्धारित पगारावर आपली बाकीची सर्व्हिस पूर्ण करावी, असे राज्य परिवहन मंडळाने म्हटले आहे.
2003 मध्ये हे प्रकरण समोर आले होते. 2 जुलै 2003 मध्ये अचानक बस निरीक्षण करतेवेळी चंद्रकांत पटेल यांच्या बसमध्ये एक प्रवाशाकडे तिकीट नसल्याचे आढळून आले. त्यावेळी प्रवाशांने अधिकाऱ्यांना सांगितले की, कंडक्टरला 9 रुपये दिले होते. मात्र, त्यांनी तिकीट दिले नाही. यानंतर अधिकाऱ्यांनी कंटक्टर चंद्रकांत पटेल यांच्याविरोधात विभागीय चौकशी नेमली होती.
याप्रकरणी जवळपास एक महिन्यानंतर कंडक्टर चंद्रकांत पटेल दोषी आढळले. त्यानंतर दंड म्हणून त्यांच्या पगारातून कपात करण्यात आली. याविरोधात चंद्रकांत पटेल यांनी आधी औद्योगिक न्यायाधिकरणकडे धाव घेतली. त्यानंतर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, दोन्ही न्यायालयात दंडाची शिक्षा कायम ठेवत त्यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.
दरम्यान, उच्च न्यायालयात चंद्रकांत पटेल यांच्या वकिलाने सांगितले की, चंद्रकांत पटेल यांना दिलेली दंडाची शिक्षा मोठी आहे. संपूर्ण सर्व्हिस पाहिली तर चंद्रकांत पटेल यांना जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. तर, दुसरीकडे राज्य परिवहन मंडळाच्या वकिलाने सांगितले, चंद्रकांत पटेल यांनी याआधी जवळपास 35 वेळा आपल्या कामकाजात चुका केल्या आहेत. त्यांना अनेकदा सामान्य दंड आणि सूचना देण्यात आली आहे.