गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, आज शपथ घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 06:52 AM2022-12-12T06:52:50+5:302022-12-12T06:53:09+5:30
हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदी सुखविंदरसिंह सुक्खू
सिमला : चार वेळा आमदार राहिलेले सुखविंदरसिंह सुक्खू यांनी रविवारी हिमाचल प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार राहिलेल्या प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभासिंह याही यावेळी हजर होत्या. रिज मैदानावर समारंभात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी सुक्खू यांना शपथ दिली. मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, केंद्रीय मंत्री आनंद शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.
गुजरातमध्ये पटेल दुपारी आज शपथ घेणार
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड यश मिळविल्यानंतर भूपेंद्र पटेल सलग दुसऱ्यांदा त्या राज्याचे मुख्यमंत्री बनणार आहेत. ते आज, १२ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह आदी केंद्रीयमंत्री तसेच भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.