गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलीच्या भागीदारांना मिळाली स्वस्तात जमीन, काँग्रेसची चौकशीची मागणी
By admin | Published: February 5, 2016 05:52 PM2016-02-05T17:52:41+5:302016-02-05T17:52:41+5:30
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुलीच्या व्यवसायातील भागीदारांना गिर अभयारण्यानजीक ४०० एकर जागा देण्यात आल्याचे वृत्त आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ५ - गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या मुलीच्या व्यवसायातील भागीदारांना गिर अभयारण्यानजीक ४०० एकर जागा देण्यात आल्याचे आणि त्यातील २५० एकर जागा १५ रुपये प्रति चौरस मीटर दराने देण्यात आल्याचे वृत्त आहे. या सगळ्या व्यवहारामध्ये घोटाला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला असून विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केली आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार गुजरात सरकारने ही जमीन वाइल्डवूड्स या कंपनीला दिली, त्यावेळी आनंदीबेन या महसूल मंत्री होत्या. ज्यावेळी ही जमीन या कंपनीला देण्यात आली त्यानंतर आनंदीबेन यांची मुलगी अनार पटेल आणि तिचे भागीदार यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा इकॉनॉमिक टाइम्सने कंपनी रजिस्ट्रारकडे करण्यात आलेल्या नोंदींच्या आधारे केला आहे.
वाइल्डवूड्सचे आत्ताचे प्रवर्तक दक्षेश शहा शाह आणि अमोल शेठ असून ते अनार पटेल यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.
आनंदीबेन पटेल आता मुख्यमंत्री आहेत, आणि महसूल खातेही त्यांच्याकडेच आहे. या संदर्भात इकॉनॉमिक टाइम्सने सर्व संबंधितांकडून प्रतिक्रिया घेतल्या असता अन्यांनी आपली बाजू मांडली परंतु गुजरात सरकारने काहीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे ईटीने म्हटले आहे. सुरुवातीला वाइल्डवूड्स दुबईस्थित उद्योगपती संजय धानक यांच्या मालकीची होती जी नंतर शाह व शेठ यांनी ताब्यात घेतली. धानक यांनी रिसॉर्ट बांधण्यासाठी ही जमीन आपण सरकारकडे मागितली होती, परंतु ते काही आपल्याला जमलं नाही.
या संदर्भात अनार पटेल यांच्या कंपनीचे अनेक आर्थिक व्यवहार झाला असून यात गैरव्यवहार झाला का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी या सगळ्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक नेमावे अशी मागणी केली आहे.