BSF कॉन्स्टेबलच्या मुलानं रचला इतिहास, आता घेणार 'एवढ्या' पगाराचं पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:01 PM2019-02-14T15:01:27+5:302019-02-14T15:47:40+5:30
अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे.
अहमदाबाद - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य होतं. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ)मध्ये तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या मुलाने हे सिद्ध करून दाखवलं आहे. अविनाश कंबोज असं या मुलाचं नाव असून अविनाशने कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंटमध्ये इतिहास रचला आहे. गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट आनंदमध्ये शिक्षण घेत असलेल्या अविनाशला 50 लाख वार्षिक पगाराचे पॅकेज मिळाले आहे.
अविनाश कंबोज हा हरयाणातील सिरसा जिल्ह्याचा रहिवासी आहे. अविनाशचे वडील कुलजीत कंबोज हे बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. अविनाशला एकूण 50.31 लाखांचे पॅकेजची ऑफर देण्यात आली असून हे पॅकेज सर्वात जास्त आहे. गेल्या वर्षी त्याच्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला 46.50 लाखांचे पॅकेज देण्यात आले होते. त्यानंतर सर्वाधिक पॅकेज मिळवणारा अविनाश हा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.
अविनाशने सिरसा जिल्ह्यातील सालरपूर गावात प्राथमिक शिक्षण घेतले आहे. त्यानंतर चौधरी चरण सिंग हरयाणा अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीमधून शेती या विषयात बीएससीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 'मी आता फ्रेशर आहे आणि ही माझी पहिलीच नोकरी आहे. तीन-चार वर्ष मला इंडस्ट्रीमध्ये अनुभव घ्यायचा आहे,' अशी माहिती प्लेसमेंटबाबत विचारले असता अविनाशने दिले.