पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 06:26 PM2024-09-18T18:26:13+5:302024-09-18T18:26:57+5:30
उच्च न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.
गुजरातमधील सुरत जिल्ह्यात एका वकिलाला लाथ मारणे पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडलं आहे. याबाबत वकिलाने तक्रार दाखल करून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्याला मोठी शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाने पोलीस अधिकाऱ्याला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. आज जर आम्ही पोलीस अधिकाऱ्याला माफ केले तर भविष्यात १० पोलीस अशाच चुका करतील, अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली.
वकील हिरेन नाई यांना लाथ मारण्याची ही घटना एक महिना जुनी आहे. वकील हिरेन नाई यांनी सुरत जिल्ह्यातील दिंडोली पोलीस निरीक्षकावर आरोप करत तक्रार दाखल केली होती. १८ ऑगस्ट रोजी मधुराम आर्केड येथील आपल्या कार्यालयातून वकील हिरेन नाई हे घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी वकील हिरेन नाई आपली गाडी सुरू करत असतानाच दिंडोली पोलिसांची पेट्रोलिंग गाडी त्याठिकाणी आली.
तेवढ्यात पेट्रोलिंग गाडीत बसलेले पोलीस निरीक्षक एच. जे. सोळंकी बाहेर आले आणि त्यांनी वकील हिरेन नाई यांना विचारले की, एवढ्या उशिरा तुम्ही आर्केड पार्किंगमध्ये काय करत होता? यानंतर एच. जे. सोळंकी यांनी वकील हिरेन नाई यांना लाथ मारली. यानंतर एच. जे. सोळंकी आणि वकील हिरेन नाई यांच्यात जोरदार वादावादी झाली. या घटनेनंतर वकील हिरेन नाई यांनी आपल्या मित्रांना फोन करून दिंडोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यानंतर सुरत जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नितीन पटेल यांच्या नेतृत्वाखाली वकील हिरेन नाई आणि जिल्हा न्यायालयातील वकिलांनी संयुक्त पोलीस आयुक्त राघवेंद्र वत्स यांच्यासमोर अर्ज दाखल करून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली. वकिलांच्या अर्जावर कारवाई करत राघवेंद्र वत्स यांनी २१ ऑगस्ट रोजी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.
राघवेंद्र वत्स यांनी पोलीस उपायुक्त (झोन-2) भगीरथ गढवी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तपासादरम्यान दिंडोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक आर.जे. चुडास्मा यांनीही हिरेन नाईक यांचा जबाब नोंदवला. तसेच पार्किंगमध्ये लावलेले सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्ही तपासादरम्यान पोलीस निरिक्षक एच. जे. सोळंकी हे वकील हिरेन नाई यांना लाथ मारताना दिसून आले.
दरम्यान, आता उच्च न्यायालयाने सुनावणी करताना पोलीस निरिक्षक एच. जे. सोळंकी यांना मोठी शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाने पोलीस निरिक्षक एच. जे. सोळंकी यांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच, आज जर आम्ही पोलीस अधिकाऱ्याला माफ केले तर भविष्यात १० पोलीस अशाच चुका करतील, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.