गुजरातमध्ये भाजपाला पुन्हा मोदींचा आधार, पंतप्रधान मोदींच्या तब्बल 50-70 सभांचं आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 12:49 PM2017-10-27T12:49:08+5:302017-10-27T13:09:56+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून प्रकर्षानं असल्याचे दिसत आहे.
अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अवलंबून प्रकर्षानं असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यामध्ये होणा-या गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास 50 ते 70 जनसभांना संबोधित करणार आहेत. दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, कच्छ आणि मुख्य शहरामध्ये पंतप्रधान जवळपास 50 ते 70 जनसभा घेणार असल्याचे बोलले जात आहे. 10 नोव्हेंबरनंतर पंतप्रधान मोदी पूर्णतः निवडणुकांच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत. 10 नोव्हेंबर रोजी गुजरातमध्ये दोन ते तीन जनसभांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या गुजरात निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीपासून ते आतापर्यंत गुजरातचा 10 वेळा दौरा केला आहे. यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट होत आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या वृत्तानुसार,गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सोशल मीडिया टीमनंही कंबर कसली आहे. निरनिराळ्या योजनांची आखणी या टीमकडून केली जात आहे. यामध्ये तरुणवर्ग आणि महिलांवर विशेषतः लक्ष देण्यात येणार आहे.
दरम्यान, यापूर्वी गुजरातमध्ये पंतप्रधानांची 15 ते 18 सभांची योजना आखण्यात आली होती. मात्र आता स्वतःहून पक्षानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना कमीत-कमी 50 सभा घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल मीडियाचा उपयोग करत अनेक सभांना संबोधित करणार असल्याची चर्चा आहे.
योगी आदित्यनाथांच्या भाषणाला वाढती मागणी
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही जनसभांना संबोधित करावे, अशी मागणी वाढू लागली आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पक्ष योगी आदित्यनाथांनाही निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे.
गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला मतदान
मतदारांना आकर्षित करण्यासाठी २५00 कोटींच्या घोषणांची खैरात करून झाल्यानंतर, अखेर गुजरात विधानसभांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या़ गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबर असे दोन टप्प्यांत मतदान होईल, असे निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केले.
दरम्यान, गुजरातच्या मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या गुजरात दौ-यांमध्ये शेतक-यांना जीएसटीमधून ७८ कोटींची सूट, २६५ कोटींचे फ्लायओव्हर्स, १६६ कोटींचे वॉटर ट्रीटमेंट प्लांटस, ६५0 कोटी खर्चाची रो रो फेरी सेवा, २८५ कोटी खर्चाचा ट्रान्सपोर्ट हब, २८५ कोटी खर्चाचे कचरा निवारण व प्रोसेसिंग युनिट्स अशा जवळपास २५00 कोटींच्या घोषणांची खैरात भाजपाने व गुजरात सरकारने केली, हा विरोधकांचा आरोप आहे.
पहिला टप्पा
१९ जिल्ह्यांतील ८९ मतदारसंघांत ९ डिसेंबर रोजी
दुसरा टप्पा
१४ जिल्ह्यांतील ९३ मतदारसंघांत १४ डिसेंबर रोजी
४.३३ कोटी एकूण मतदार
५० हजार १२८ मतदान केंद्रे
182 जागा