Gujarat Election 2022: अमित शहांचे ‘मिशन गुजरात’, बंडखोरी रोखण्याची मोहीम; ४० नाराजांना समजावण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 09:06 AM2022-11-18T09:06:29+5:302022-11-18T09:17:06+5:30
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या भाजप नेत्यांच्या असंतोषानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समजावण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.
- हरिश गुप्ता
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारलेल्या भाजप नेत्यांच्या असंतोषानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समजावण्याची कोणतीही कसर सोडलेली नाही.
पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्याची अखेरची तारीख १७ नोव्हेंबर व दुसऱ्या टप्प्यासाठी अर्जाची अखेरची तारीख २१ नोव्हेंबर आहे. यासाठी अमित शहा आभासी पद्धतीने तेथे काम करीत आहेत. भाजप मुख्यालयातून मिळालेल्या संकेतांनुसार, अमित शहा यांनी बंडखोरांना व्यक्तीश: फोन करून कारणांची विचारणा केली आहे. अशा प्रकारचा असंतोष १५ वर्षांत यापूर्वी कधीही पाहण्यात आलेला नव्हता.
असंतुष्टांनी माघार घ्यावी, यासाठी अमित शहा यांनी १२ पथके तयार केली असून, त्यांनी असंतुष्टांना प्रेमाने व सद्भावनेने समजावून सांगावे, असे निर्देश दिलेले आहेत. असंतुष्ट हे भाजप परिवारातलेच असल्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूतीने वागावे, असा सल्लाही शहा यांनी दिला आहे.
नेमके काय होणार?
राज्यात २७ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. मात्र, अशा प्रकाराची नाराजी कधीच दिसली नव्हती. परंतु पक्ष सोडलेले अनेक ज्येष्ठ नेते मानण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत.
माजी आमदार आणि भाजपचे आदिवासी नेते हर्षद वसावा यांनी भाजप सोडून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.
ते गुजरात भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत व राजपिपला जागेचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केलेले आहे.
सौराष्ट्रमध्ये माजी आमदार अरविंद लडानी यांना केशोड येथून उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
शहा यांचे बंडखोरांशी बोलणे झाले आहे व असंतुष्टांनी पक्षाच्या कामात परतण्याचे मान्य केले आहे. राज्यात भाजपचा विक्रमी विजय होईल व आपचे कोणतेही आव्हान नाही, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
आपच्या उमेदवाराने मागितले पोलिस संरक्षण
सुरत (पूर्व) मतदासंघातील आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार कांचन जरीवाला यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर गुरुवारी पोलिस संरक्षणाची मागणी केली. दरम्यान, भाजपने अपहरण करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले, असा घणाघाती आरोप आम आदमी पार्टीने (आप) केला. तथापि, जरीवाला यांनी आपण स्वेच्छेने उमेदवारी मागे घेतल्याचे सांगत भाजपने दबाव आणल्याचा इन्कार केला. उलट पक्ष कार्यकर्त्यांनी पैशांची मागणी सुरू केल्याने पूर्ण करू शकत नसल्याने आपण उमेदवारी मागे घेतली, असा दावा जरीवाला यांनी केला.
...तर त्याला घरी जाऊन गोळी घालेन
nनिवडणुकीच्या रणधुमाळीची रंगत वाढत चालली आहे. टीका, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यामुळे वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. वेगवेगळे पक्ष, उमेदवार मतदार व कार्यकर्त्यांना वेगवेगळी आश्वासने देत आहेत. मात्र, काही आश्वासने ऐकल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येते. असेच एक आश्वासन सलग सहावेळा निवडून येऊनही भाजपने तिकीट नाकारलेले बाहुबली उमेदवार मधु श्रीवास्तव यांनी दिले. जर तुम्हांला कोणी हात लावला तर मी त्याच्या घरी जाऊन त्याला गोळी घालेन, असे ते म्हणाले. जर कोणी तुमची कॉलर धरली तर मी त्याच्या घरी जाऊन त्याला गोळी नाही घातली तर माझे नाव मधुभाई नाही, असे श्रीवास्तव म्हणाले.
nमेळाव्यादरम्यान मिशीवर ताव देत त्यांनी गोळीची भाषा केली. त्यांच्या या प्रचार मेळाव्याचा व्हिडीओ समोर आला आहे. विशेष म्हणजे श्रीवास्तव यांच्या या विधानावर त्यांचे कार्यकर्ते टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देत असल्याचे यात दिसून येते. श्रीवास्तव वाघेडिया मतदारसंघातून सातव्या वेळी भवितव्य आजमावत आहेत. ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शंकरसिंह वाघेला यांना मुख्यमंत्री बनवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.