Shraddha Murder Case: “…तर प्रत्येक शहरात आफताब जन्माला येईल”; गुजरात निवडणुकीत श्रद्धा हत्याकांडाचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 03:39 PM2022-11-19T15:39:50+5:302022-11-19T15:40:56+5:30
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा हत्याकांडामुळे देशभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे तीव्र पडसाद आता गुजरात निवडणूक प्रचारातही उमटताना दिसत आहेत.
Shraddha Walkar Murder Case:श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर देशभरात एकच खळबळ उडाली आहे. प्रियकर आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटताना दिसत असून, गुजरात निवडणूक प्रचारातही (Gujarat Election 2022) हा मुद्दा येताना दिसत आहे. भाजपचे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा (CM Himanta Sarma) यांनी श्रद्धा हत्याकांडाचे प्रकरण लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचा दावा केला आहे.
आपल्या देशामध्ये सक्षम नेतृत्व नसेल, देशाची आईप्रमाणे काळजी घेणारे सरकार नसेल तर असे आफताब प्रत्येक शहरामध्ये तयार होतील. तसेच असे झाले तर आपण आपल्या समाजाची सुरक्षा करु शकणार नाही, अशी शक्यता मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी म्हटले आहे. आफताबने श्रद्धाला मुंबईवरुन घेऊन आला आणि लव्ह-जिहादच्या नावाखाली ३५ तुकडे केले तिच्या मृतदेहाचे. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह फ्रिजमध्ये ठेवला. मृतदेह फ्रिजमध्ये होता त्याचवेळेस तो दुसऱ्या मुलीला घेऊन आला आणि डेटींग करु लागला, असे शर्मा यांनी या प्रकरणासंदर्भात म्हटले आहे.
आपण आपल्या समाजाची रक्षाही करु शकणार नाही
देशाकडे एक शक्तिशाली नेतृत्व, नेता नसेल, देशाला आई मानणारे सरकार नसेल तर प्रत्येक शहरामध्ये असा आफताब जन्माला येईल. आपण आपल्या समाजाची रक्षाही करु शकणार नाही, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी, श्रद्धा हत्याकांडात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तपासादरम्यान आफताबची चौकशी केल्यानंतर आता आफताब हा सीरियल किलर असण्याची शक्यताही पोलिसांना आहे.
दरम्यान, आफताबच्या संपर्कात आलेल्या इतर मुलींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. त्याच्या डिजिटल फूटप्रिंटच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत. आफताब डेटिंग एपच्या माध्यमातून मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा, त्यामुळे पोलीस त्याची हिस्ट्री चेक करण्यात व्यस्त आहेत. आफताबच्या जबाबात सततच्या विसंगतीमुळे आफताब अजूनही काहीतरी लपवत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"