"मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा", गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 12:57 PM2022-12-01T12:57:34+5:302022-12-01T13:00:43+5:30

gujarat election 2022 : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचेही हर्ष सांघवी म्हणाले.

gujarat election 2022 home minister harsh sanghvi said i chant modi 1008 times | "मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा", गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन

"मोदी-मोदी असा 1008 वेळा जप करतो, तुम्हीही करावा", गृहमंत्र्यांचे जनतेला आवाहन

googlenewsNext

साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या 2022 च्या (Gujarat Election 2022)  पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज ८९ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यासाठी 788 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होत आहे. दरम्यान, गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी (Harsh Sanghavi) म्हणाले की, "मी 1008 वेळा मोदी-मोदी असा जप करतो आणि मी सर्वांना सांगतो की, प्रत्येकाने मोदी-मोदी जप करावा." याचबरोबर, गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजप पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचेही हर्ष सांघवी म्हणाले.

दुसरीकडे, असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) मंगळवारी गुजरात निवडणुकीशी संबंधित काही आकडेवारी सादर केली आहे. या आकडेवारीनुसार, गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सांघवी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 721 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या निवडणुकीत सर्व पक्षांनी रिंगणात उतरवलेल्या 125 आमदारांपैकी मालमत्ता वाढीच्या बाबतीत अव्वल पाच आमदार भाजपचे  (BJP) असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष सांघवी आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता 2017 मध्ये 2.12 कोटी रुपये होती. ती आता 2022 मध्ये 17.42 कोटी रुपये झाली आहे, असे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) रिपोर्टद्वारे समोर आले आहे. तसेच, हिरे व्यापारी हर्ष सांघवी पुन्हा एकदा सूरतच्या माजुराच्या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. रिपोर्टनुसार, सांघवीच्या तुलनेत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची संपत्ती 2017 मध्ये 5.19 कोटी रुपयांवरून 2022 मध्ये 58 टक्क्यांनी वाढून 8.22 कोटी रुपये झाली आहे.

दरम्यान, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 2.39 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 1,24,33,362 पुरूष तर 1,15,42,811 महिला मतदार आहेत. याशिवाय पहिल्या टप्प्यात  497 तृतीयपंथी मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याचबरोबर, निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी एकूण 25434 मतदान केंद्रे केली आहेत. त्यामुळे मतदारांना कोणताही त्रास होणार नाही. त्यापैकी 9018 शहरी मतदान केंद्रे असून 16416 ग्रामीण मतदान केंद्रे आहेत.

182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार
गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला विधानसभेच्या 89 जागांवर मतदान होत आहे, तर दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला 93 जागांसाठी मतदान होणार आहे. 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. यानंतर गुजरातमध्ये पुन्हा कोण सत्तेवर बसणार, हे स्पष्ट होईल. भाजप, काँग्रेस आणि आप हे तिन्ही पक्ष जोरदार निवडणूक लढवत आहेत. यंदाच्या निवडणुकीत आप जोरदारपणे निवडणूक लढवत असल्याने ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

Web Title: gujarat election 2022 home minister harsh sanghvi said i chant modi 1008 times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.