Gujarat Election 2022: गुजरात निवडणुकीवरून रवींद्र जडेजाच्या कुटुंबात वादळ, पत्नी-बहीण आमनेसामने? काँग्रेस घेणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 11:37 AM2022-11-11T11:37:47+5:302022-11-11T11:37:47+5:30
Gujarat Assembly Election 2022: गुजरात निवडणुकीसाठी भाजपाने जामनगर येथून क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीनंतर रवींद्र जडेजाच्या कुटुंबात राजकीय वादळ आले आहे.
अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाने जामनगर येथून क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा हिला उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या उमेदवारीनंतर रवींद्र जडेजाच्या कुटुंबात राजकीय वादळ आले असून, रिवाबाविरुद्ध रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा ही काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण नयनाबा हिला काँग्रेसने अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. मात्र ती पक्षासाठी जोरदार प्रचार करत आहे.
जामनगर येथील जागेबाबत नयनाबा म्हणाली होती की, ‘’मला वाटते जर भाजपाने येथे कुठला नवा चेहरा आणला तर विधानसभेतील ७८ क्रमांकाचा मतदारसंघ काँग्रेस जिंकू शकेल. कारण नव्या चेहऱ्याकडे अनुभवाची कमतरता असेल. तसेच राजकीय ज्ञानही कमी असेल. केवळ पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही. मला वाटते जर भाजपाने नवा चेहरा आणला तर काँग्रेस ही जागा जिंकेल’’. गुजरात विधानसभेतील ७८ क्रमांकाचा मतदारसंघ हा जामनगर उत्तर हा आहे. या मतदारसंघात भाजपाने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला उमेदवारी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून रिवाबा गुजरातच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय होती. तेव्हापासूनच येथे भाजपा रिवाबाला उमेदवारी देईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. दुसरीकडे रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. एकीकडे रिवाबा हिला रवींद्र जडेजाकडून पाठिंबा मिळतो. तर दुसरीकडे बहिणीला जडेजाचे वडील अनिरुधसिंह यांचा पाठिंबा आहे.
दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असलेल्या नणंद आणि भावजयीमध्ये नेहमी राजकारणावरून वादविवाद होत असतात. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात मास्कवरून दोघी जणी आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी रिवाबा हिच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. त्यावेळी तिने मास्क व्यवस्थित लावला नव्हता. त्यावरून नयनाबा हिने रिवाबावर टीका केली होती.