Gujarat Election 2022: ही निवडणूक २५ वर्षांचे भवितव्य ठरवणारी, पंतप्रधान नरेंद्र माेदी, आता माेठी झेप घेण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 11:06 AM2022-11-25T11:06:20+5:302022-11-25T11:07:02+5:30
Gujarat Election 2022: गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक ही आमदार किंवा सरकार निवडण्यासाठी नसून राज्याचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरविण्यासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे म्हटले.
पालनपूर : गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक ही आमदार किंवा सरकार निवडण्यासाठी नसून राज्याचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरविण्यासाठी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे म्हटले.
बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते. केंद्रातील व गुजरातमधील भाजप प्रणीत सरकारांनी राज्यामध्ये खूप विकासकामे केली आहेत. परंतु आता ‘मोठी झेप’ घेण्याची वेळ आली आहे.“ही निवडणूक कोण आमदार होईल व कोणाचे सरकार सत्तेवर येईल याची नाही, तर गुजरातचे पुढील २५ वर्षांचे भवितव्य ठरवणारी आहे. गुजरातला विकसित राज्यांच्या श्रेणीत आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,” असेही पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले, “तुम्ही मला तुमच्या समस्या सांगण्याची गरज नाही; कारण मी इथे लहानाचा मोठा झालो आहे.’’
भाजपच्या कुशासनावर बोला : खरगे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दूषण देण्याऐवजी राज्यातील भाजपच्या कुशासनावर बोलले पाहिजे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रतिहल्ला चढवला. २७ वर्षांचा हिशेब द्या, गुजरात उत्तरे मागत आहे, असे ट्वीट काँग्रेस अध्यक्षांनी केले.
भाजप पूर्वीसारखा नाही : गहलोत
भाजप आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असे म्हणत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर हल्ला चढविला. गुजरातमधील किमान ३३ आणि हिमाचलमधील २१ आमदारांनी बंडखोरी केली आहे. लोक बोलू लागले आहेत, असे ते म्हणाले.