Gujarat Election 2022: जिथे उडाला होता भाजपचा धुव्वा तिथे संघाच्या पसंतीचा उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:57 AM2022-11-15T08:57:13+5:302022-11-15T08:57:31+5:30
Gujarat Election 2022: अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे मोठे झाले.
अहमदाबाद : अहमदाबादपासून ९० किलोमीटर दूरवरील उंझा विधानसभा मतदारसंघातील वडनगर हे गाव पंतप्रधान मोदी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. तेथेच मोदी लहानाचे मोठे झाले. या गावाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी बजावली तरी २०१७ च्या निवडणुकीत उंझा विधानसभेत काँग्रेसने भाजपवर विजय मिळविला होता.
१९७२ नंतर २०१७ मध्ये येथे काँग्रेस जिंकण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाटीदारांचे आंदोलन आणि ४ वेळा येथून भाजप आमदार राहिलेले नारायणभाई लल्लूदास पटेल यांच्या प्रदीर्घ सत्तेविरोधाची नाराजी. २०१७ मध्ये काँग्रेसचे आशा पटेल यांनी निवडणूक जिंकली, परंतु २०१९ मध्ये त्या भाजपमध्ये गेल्या. यंदा उंझा मतदारसंघात भाजपने कीर्तिभाई केशव पटेल यांना उमेदवारी दिली आहे. ते सरसंघचालक मोहन भागवत यांच्या जवळचे मानले जातात.
गढवींसमोर मोठे आव्हान
खंभलिया मतदारसंघात अहिर समाजाची सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि १९७२ पासून या जागेवरून केवळ अहिर उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचला आहे. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इसुदन गढवी यांच्यासाठी हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. गढवी यांचा सामना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार विक्रम माडम आणि भाजपचे मुलू बेरा यांच्याशी होणार आहे.