Gujarat Election: 'या' नेत्यामुळे भाजपचा गुजरातमध्ये मोठा विजय; PM नरेंद्र मोदींनी दिले श्रेय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 02:31 PM2022-12-14T14:31:20+5:302022-12-14T14:32:20+5:30
Gujarat Election: सर्वजण गुजरात विजयाचे श्रेय PM मोदींना देत आहेत, पण मोदींनीच या नेत्याला सर्व श्रेय दिले आहे.
Gujarat Election: गुजरातमधील भारतीय जनता पक्षाचे (BJP) सर्व नेते आणि कार्यकर्ते भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयाचे श्रेय देत असतील, पण या विजयाचे खरे श्रेय कोणाला द्यावे, हे खुद्द पंतप्रधानांनीच सांगितले आहे. आज संसद भवनात भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीदरम्यान त्यांनी या विजयाचे श्रेय गुजरात भाजपचे अध्यक्ष सी.आर.पाटील यांना दिले.
बुधवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत भाजपच्या खासदारांनी गुजरातमध्ये पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. या हिवाळी अधिवेशनात भाजपच्या संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती. गुजरात भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांचाही सत्कार करण्यात आला, अशी माहिती पक्षाच्या एका कार्यकर्त्याने दिली. कार्यकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान म्हणाले की, राज्यातील मोठ्या विजयाचे श्रेय पाटील यांना दिले पाहिजे. गुजरातमध्ये 182 पैकी 156 जागा जिंकून भाजपने मागील सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
पीएम पुढे म्हणाले की, जर एखाद्या राज्य युनिटने गुजरात युनिटप्रमाणे काम केले तर पक्षाची कामगिरी नेहमीच चांगली राहील. पक्षाला इतका निर्णायक जनादेश दिल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले पाहिजेत, असेही पंतप्रधान म्हणाले. बैठकीत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थव्यवस्थेवर सादरीकरण केले. अन्य एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्यांनी खासदारांना महागाई नियंत्रणात असल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींनी खासदारांना खेलो इंडिया सारख्या मोहिमेवर काम करत राहण्याचे आवाहन केले. G20 शिखर परिषदेत लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचा विचार केला जावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. यापूर्वी देखील पंतप्रधान मोदींनी आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांना हे सुनिश्चित करण्यास सांगितले होते की शिखर परिषदेचा उपयोग भारताची संस्कृती, विविधता आणि भारतीयत्व दर्शविण्यासाठी व्यासपीठ म्हणून केला जाईल.