Exit Poll : गुजरातमध्ये AAP ची हार, तरीही केजरीवालांसाठी 2 आनंदाच्या बातम्या! लागणार मोठी लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 01:02 PM2022-12-06T13:02:27+5:302022-12-06T13:06:57+5:30
8 डिसेंबरला मतमोजणी होणार असून पुढील 5 वर्षे कुणाचे सरकार राहणार आणि कुणाला विरोधी पक्षात बसावे लागणार हे स्पष्ट होईल.
गुजरात मधील जनतेने आपला निर्णय निश्चित केला आहे. गुजरातमध्ये सर्वच्या सर्व 182 जागांवर दोन टप्प्यात मतदान पार पडले. 8 डिसेंबरला मतमोजणी होणार असून पुढील 5 वर्षे कुणाचे सरकार राहणार आणि कुणाला विरोधी पक्षात बसावे लागणार हे स्पष्ट होईल. सध्या, समोर आलेल्या जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजप गुजरातमध्ये सलग सातव्यांदा सरकार स्थापन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2017 मध्ये जबरदस्त टक्कर देणारा काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पछाडीवर पडण्याची शक्यता आहे. तर पहिल्यांदाच सर्वच्या सर्व जागांव उमेदवार देणारा आम आदमी पक्षही दाव्याप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही, असे दिसत आहे.
एक्झिट पोल्समध्येही आम आदमी पक्षाला किमान 2 आणि जास्तीत जास्त 21 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, 'आप'ला 9-21 जागा मिळू शकतात. एबीपी सी व्होटरने 3-11 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. तर रिपब्लिक-पी मार्कने 2-10 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला आहे. तसेच टाइम्स नाऊ ईटीजीनेही जवळपास 11 जागा मिळू शकतात असे म्हटले आहे.
एक्झिट पोलमध्ये केजरीवाल यांच्या पक्षाला फार कमी जागा मिळत असल्या तरी, ज्या पक्षाचे ५ वर्षांपूर्वी डिपॉझिट जप्त झाले होते, त्या पक्षाला यावेळी बऱ्याच अंशी यश मिळताना दिसत आहे. केजरीवाल यांनी गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर रॅली आणि रोड शो करत भाजपच्या सर्वात मोठ्या बालेकिल्ल्यात जबरदस्त एन्ट्री केला आहे.
या पक्षाने दुसऱ्याच प्रयत्नात तिसऱ्या शक्तीच्या रुपात आपली ओळख निश्चितपणे निर्माण केली आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला जास्तीत जास्त 20 टक्के व्होट शेअर मिळण्याची शक्यता आहे. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया आणि न्यूज 24 टुडेज चाणक्य यांनी या निवडणुकीत आपला 20 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे, इंडिया टीव्ही मॅटर्सच्या सर्वेक्षणात आम आदमी पक्षाला 8 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मिळू शकतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा -
गुजरातमध्ये केजरीवाल यांचे भाकीत (92+ जागा जिंकण्याचे) खरे ठरत नसले तरी, बहुतांश एक्झिट पोलमध्ये त्यांच्यासाठी व्होटशेअरच्या बाबतीत गुड न्यूज आहे. गुजरातमध्ये 6 टक्क्यांहून अधिक मते मिळाल्यास आप राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग मोकळा होईल. अवघ्या दशकापूर्वी अस्तित्वात आलेल्या या पक्षाला तीन राज्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळाला आहे. आता चौथ्या राज्यात हा दर्जा मिळाल्यास आपला राष्ट्रीय पक्षाचीही मान्यताही मिळेल. केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्ली, पंजाब आणि गोव्यात प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला आहे.