Gujarat Election: गुजरात निवडणुकीवर IB चा रिपोर्ट; आपचे सरकार बनतेय? दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 08:04 PM2022-10-02T20:04:15+5:302022-10-02T20:04:47+5:30
आपचे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. यामुळे हे अंतर वाढविण्यासाठी गुजरातच्या लोकांना एक मोठा धक्का द्यावा लागणार आहे, असे केजरीवाल म्हणाले.
एकीकडे वेगवेगळ्या संस्थांचे गुजरात निवडणुकीवरील रिपोर्ट येत असताना आपने आयबीच्या धक्कादायक रिपोर्टचा दावा केला आहे. इंटेलिजन्स ब्युरोने गुजरातमध्ये कोणाचे सरकार बनतेय याचा गुप्त रिपोर्ट केंद्र सरकारला दिला असल्याचा दावा आपने केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी गुप्तचर खात्याचा रिपोर्टबाबत दावा केला आहे. यामध्ये जर आज निवडणुका झाल्या तर आपचे सरकार येईल, असे हा रिपोर्ट सांगत असल्याचे केजरीवाल म्हणाले. भाजपा आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये कडवी टक्कर होणार असून यामुळे गुजरातच्या लोकांना मोठा धक्का देण्याची गरज असल्याचेही केजरीवाल म्हणाले आहेत.
केजरीवाल यांना सुत्रांनी ही माहिती दिली आहे. आपचे सरकार फार कमी फरकाने येणार आहे. आपण खूप कमी जागांनी पुढे आहोत. यामुळे हे अंतर वाढविण्यासाठी गुजरातच्या लोकांना एक मोठा धक्का द्यावा लागणार आहे. यामुळे आपला मोठे बहुमत मिळेल आणि सरकार बनेल, असे केजरीवाल म्हणाले. जेव्हापासून हा आयबीचा रिपोर्ट आला आहे, तेव्हापासून भाजपा आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ते गुप्त बैठका घेत आहेत. विशेषत: भाजप या अहवालामुळे घाबरला आहे, असा दावा त्यांनी केला. भाजपविरोधी मतांचे विभाजन व्हावे यासाठी हा पक्ष काँग्रेसला बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
या पत्रकार परिषदेला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. दोन्ही AAP नेते गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या जाहीर सभा होत्या. या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये निवडणूक होणार आहे.