जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले; मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले

By यदू जोशी | Published: December 9, 2022 06:02 AM2022-12-09T06:02:55+5:302022-12-09T06:05:29+5:30

अहमदाबादचा गड भाजप अधिक मजबूत करील, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते. अहमदाबादेत शहर आणि जिल्हा मिळून असलेल्या २१ पैकी १९ जागा जिंकून पक्षाने जोरदार मुसंडी मारली.

Gujarat Election Result: BJP Strong hold in State, Make New Record, Congress and AAP set back | जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले; मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले

जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले; मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले

googlenewsNext

अहमदाबाद - भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य गुजरातवरील पकड या पक्षाने गुरुवारच्या निकालात अधिक मजबूत केली. काँग्रेसकडून महत्त्वाच्या जागा हिसकावून घेतल्या. त्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुखरामसिंह राठवा, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल (बोस्की) असे दिग्गज चारीमुंड्या चित झाले. उत्तर गुजरातमध्येही गेल्या वेळेपेक्षा मोठे यश भाजपने संपादन केले. 

अहमदाबादचा गड भाजप अधिक मजबूत करील, असे भाकीत ‘लोकमत’ने वर्तविले होते. अहमदाबादेत शहर आणि जिल्हा मिळून असलेल्या २१ पैकी १९ जागा जिंकून पक्षाने जोरदार मुसंडी मारली. दर्यापूर, दाणीलिमडा, साणंद आणि बापूनगरची जागाही काँग्रेसने गमावली. आणंदच्या अमूल डेअरीचे अध्यक्ष रामसिंग परमार यांचे पुत्र योगेंद्रसिंह हे बाजूच्या खेडा जिल्ह्यातील ठासरा मतदारसंघात भाजपकडून जिंकले. 

माेदी म्हणाले ते खरे ठरले...
गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीही कधी दीडशे जागा जिंकून आणल्या नाहीत; पण भूपेंद्र पटेल यांनी त्यापेक्षा अधिक जागा मिळवल्या. त्यावरून, जे नरेंद्रला जमले नाही ते भूपेंद्रनी केले... अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियावर लक्षवेधी ठरला. २००२ च्या निवडणुकीत मोदी मुख्यमंत्री असताना भाजपने १२७ जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी प्रचारादरम्यान एका सभेमध्ये ‘नरेंद्र का रिकॉर्ड भूपेंद्र तोड़ेंगे’ असा विश्वास नरेंद्र मोदींनीही व्यक्त केला होता. 

उत्तर गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा दणका
उत्तर गुजरात भाजपने काँग्रेसला मोठा दणका दिला. काँग्रेसला आठच जागांवर समाधान मानावे लागले. ‘आप’चे खातेही उघडले नाही. दोन अपक्ष जिंकले. बनासकाठामध्ये नऊपैकी प्रत्येकी चार जागा भाजप, काँग्रेसने तर एक अपक्षाने जिंकली. मेहसाणामध्ये सहापैकी पाच जागांवर भाजप, तर एकावर काँग्रेस जिंकली. पाटणामध्ये भाजप व काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा लोकसभेचा मतदारसंघ असलेल्या गांधीनगरमध्ये पाचही जागा भाजपने जिंकल्या. अरवलीमध्ये दोन भाजप, एक काँग्रेस असे चित्र राहिले. 

मूळ मराठी भाषिक शुक्ला जिंकले
यंदा वाघोडियाची जागा भाजपकडून गेली. चौकोनी लढतीत अपक्ष धर्मेंद्रसिंह वाघेला जिंकले. भाजपचे बंडखोर मधू श्रीवास्तव यांची अनामत जप्त झाली. काँग्रेसचे सत्यजितसिंह गायकवाड आणि भाजपचे अश्विन पटेलही हरले. गायकवाड हे साताऱ्याचे भाजप आमदार शिवेंद्रसिंह भोसले यांचे मेहुणे आहेत. ते युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मूळ मराठी भाषिक असलेले बाळकृष्ण शुक्ला भाजपतर्फे रावपुरामध्ये (बडोदा) जिंकले.

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पराभूत; पक्षाला भोपळा 
काँग्रेसने युतीमध्ये राष्ट्रवादीला दोन जागा दिल्या होत्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल (बोस्की) यांचा आणंदमधील उमरेथमध्ये दारुण पराभव झाला. राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार नकूल तोमर (नरोडा; अहमदाबाद) यांनाही पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीला भोपळा मिळाला.

विरोधी पक्षनेते बसले घरी
आदिवासीबहुल छोटा उदेपूर जिल्ह्यातील पावी जेतपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते सुखरामसिंह राठवा यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपचे जयंती राठवा यांनी त्यांच्यावर मात केली. विशेष म्हणजे येथे ‘आप’च्या राधिका राठवा दुसऱ्या क्रमांकावर, तर सुखरामसिंह तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

मोदी-शहांच्या गावात कमळ फुलले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गाव वडनगर आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मानसा गावात पुन्हा एकदा कमळ फुलले आहे. गेल्यावेळी दोन्ही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला होता, मात्र यावेळी भाजपने वडनगर आणि मानसासाठी वेगळी रणनीती आखली होती. भाजपचे उमेदवार किरीट पटेल हे उंझा येथे, तर जयंती भाई पटेल हे मानसात विजयी झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Gujarat Election Result: BJP Strong hold in State, Make New Record, Congress and AAP set back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.