गुजरात निवडणूक - सौराष्ट्र-कच्छमध्ये काँग्रेस तर दक्षिण-मध्य गुजरातमध्ये भाजपाला मोठी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:15 PM2017-12-18T12:15:02+5:302017-12-18T12:16:46+5:30
गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 22 वर्षानंतरही गुजरातमध्ये सत्ता कायम टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे.
अहमदाबाद - गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. 22 वर्षानंतरही गुजरातमध्ये सत्ता कायम टिकवण्यात भाजपा यशस्वी ठरली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या तासाभरात काँग्रेसने भाजपावर आघाडी घेतली होती. त्यामुळे गुजरातमध्ये सत्ता पालट होतोय कि काय अशी स्थिती निर्माण झाली होती. पण मतमोजणीच्या पुढच्या फे-या सुरु झाल्यानंतर भाजपाने आघाडी घेतली.
भाजपाला रोखण्यासाठी यावेळी काँग्रेसने जातीय समीकरणाचे कार्ड खेळले. भाजपावर नाराज असलेल्या पाटीदार पटेलांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. सौराष्ट्र-कच्छ हा भाजपाचा बालेकिल्ला पण काँग्रेसने इथे ब-यापैकी यश मिळवले आहे. उत्तर गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये भाजपाने घवघवती यश मिळवले आहे. त्यामुळे भाजपाने सौराष्ट्र-कच्छचे नुकसान मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये भरुन काढले आहे.
शहरी भागातही भाजपाने दमदार कामगिरी केली असून काँग्रेस पिछाडीवर आहे. गुजरातच्या ग्रामीण भागात काँग्रेसने भाजपावर निसटती आघाडी घेतली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे यंदा संपूर्ण गुजरात पिंजून काढले. प्रसारमाध्यमांनी केलेल्या रिपोर्टींगमध्येही गुजरातमध्ये सत्ताधारी पक्षाविरोधात मोठी नाराजी असल्याचे दाखवले होते. पण प्रत्यक्षात मतपेटीतून ही नाराजी व्यक्त झाली नाही. गुजरातमधला व्यापारी वर्ग नोटाबंदी, जीएसटीमुळे भाजपावर नाराज असलल्याचे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात गुजरातमधल्या सर्वच घटकांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे.