गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! पूरजन्य परिस्थितीत कुत्र्यासाठी लोकांची एकी अन् माणुसकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 03:02 PM2024-09-04T15:02:48+5:302024-09-04T15:19:01+5:30
gujarat floods 2024 : गुजरातमध्ये सततच्या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
gujarat floods update : गुजरातमध्ये संततधार पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत पुरामुळे ३० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि २४,००० लोक बेघर झाले आहेत. पाण्याने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक नद्या आणि नाले ओसंडून वाहत आहेत. आजूबाजूचा परिसर जलमय झाला आहे, अडकलेल्या लोकांना हेलिकॉप्टरमधून बाहेर काढावे लागले. अशातच एक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ समोर आला, जो सर्वांची मनं जिंकत आहे. वडोदरातील पुरातून एका कुत्र्याला वाचवण्यासाठी आणि त्याला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी लोकांनी एकमेकांना सहकार्य करत त्या मुक्या जीवाला संकटातून बाहेर काढून माणुसकी दाखवली.
पुरातून कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी संबंधित लोकांनी खाटेचा वापर केला. वडोदरा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या कुत्र्याला पूरग्रस्त भागात प्राणीप्रेमींनी वाचवले. कुत्र्याला खांद्यावर घेऊन त्याला पुरापासून वाचवत असलेल्या लोकांचे नेटकरी कौतुक करत आहे. या व्हिडीओवर अनेकजण कमेंट्सच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. गुजरातमधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुराच्या पाण्यामुळे अनेक खेडी, वाड्या-तांड्यांना पाण्याचा विळखा कायम आहे. त्यामुळे झोपड्या आणि तात्पुरत्या निवाऱ्यात राहणाऱ्यांना शाळा, मंदिरे आणि इतर इमारतींत आश्रय घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
An Elderly Dog was Rescued from Drowning in Vadodara Floods by the Local Community 🫡
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 4, 2024
https://t.co/3MsEUauOLN
पावसाचा हाहाकार
१९७६ नंतर प्रथमच ऑगस्टमध्ये चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण झाले आहे.
१९८१ ते २०२३ दरम्यान ऑगस्टमध्ये केवळ तीन चक्रीवादळे आली आहेत.
१९७६ चक्रीवादळ ओडिशात तयार झाले आणि अरबी समुद्रात दाखल झाले.
१९४४ च्या चक्रीवादळाने उग्र रूप धारण केले होते.
१९६४ गुजरात किनाऱ्याजवळ चक्रीवादळ आले होते.