गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, १७८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 09:17 AM2024-08-29T09:17:09+5:302024-08-29T09:22:54+5:30

Gujarat floods: आतापर्यंत पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

Gujarat floods: Death toll rises to 26, PM Modi dials CM;17800 rescued, more rain likely today as IMD issues 'red' alert  | गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, १७८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू, १७८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

Gujarat floods:  अहमदाबाद : गुजरातवर आभाळ फाटले असून, मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक भागांत पुरासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नदीकाठची गावं, रस्ते आणि वाहनं पाण्यात गेली आहेत. गुजरातमध्ये पावसाशी संबंधित अनेक घटनांमध्ये आणखी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे तीन दिवसांत पावसामुळं जीव गमावणाऱ्यांची संख्या २६ झाली आहे. याचबरोबर, आतापर्यंत पूरग्रस्त भागातून १७,८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मोरबी जिल्ह्यातील हलवद तालुक्यातील धवना गावाजवळ पूल ओलांडताना ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये वाहून गेल्याने बेपत्ता झालेल्या सात जणांचा मृत्यू झाला. या पुलावरून पाणी वाहत होते. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच. वडोदरा येथे पाऊस थांबला असूनही, शहरातून वाहणाऱ्या विश्वामित्री नदीचं पाणी काठ तोडून रहिवासी भागात आले, त्यामुळं सखल भागात पाणी साचले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला आणि संकटकाळात राज्याला सर्व सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान, एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, भारतीय हवाई दल, भारतीय तटरक्षक दल एकत्रित बचाव आणि मदतकार्य करत आहेत. बुधवारी सौराष्ट्र विभागातील देवभूमी द्वारका, जामनगर, राजकोट आणि पोरबंदर या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ६ ते १२ तासांच्या कालावधीत ५० मिमी ते २०० मिमी पाऊस झाला. देवभूमी द्वारका जिल्ह्यातील भानवड तालुक्यात या कालावधीत १८५ मिमी पाऊस झाला, जो राज्यातील सर्वाधिक आहे.

आजही अतिवृष्टीचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज सुद्धा सौराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, वडोदरा शहरातील घरांमध्ये आणि छतावर अडकलेल्या लोकांना एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराच्या तीन तुकड्यांद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसंच,  मंत्री हृषिकेश पटेल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, वडोदरामधून आतापर्यंत ५,००० हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. बुधवारी लष्कराच्या तीन अतिरिक्त तुकड्या आणि एनडीआरएफ आणि एसडीआरएफची प्रत्येकी एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली.

खरगे, राहुल गांधींकडून दुःख व्यक्त 
गुजरातमध्ये पूरपरिस्थितीत झालेले नुकसान आणि जीवितहानीबद्दल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त करीत पक्ष कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. राहुल गांधी यांनी केंद्र सरकारने पूरग्रस्तांना सर्व मदत पुरवण्याचे आवाहन केले.
 

Web Title: Gujarat floods: Death toll rises to 26, PM Modi dials CM;17800 rescued, more rain likely today as IMD issues 'red' alert 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.