Gujarat Floods : भीषण! गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर; ४९ जणांचा मृत्यू, ३७ हजार लोकांचा वाचवला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:01 PM2024-09-05T12:01:31+5:302024-09-05T12:07:22+5:30
Gujarat Floods : जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
गुजरातमध्ये मुसळधार पावसाने कहर केला आहे. जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पिकांचंही मोठं नुकसान झालं.
पोरबंदर, जुनागढ, कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका आणि जुनागड या अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांना मोठा फटका बसला आहे. जिथे अनेक दिवस पुराने कहर केला आहे. पुरामुळे रस्ते आणि शेतीचं नुकसान झालं आहे. वडोदरा आणि इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे घरांचंही मोठं नुकसान झालं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत गुजरातमध्ये ११८ टक्के पाऊस झाला आहे.
४९ जणांचा मृत्यू
गुजरातमधील कच्छमध्ये सर्वाधिक १८० टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर उत्तर गुजरातमध्ये सर्वात कमी ९४ टक्के पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, २५ ते ३० ऑगस्ट दरम्यान गुजरातच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. या काळात वीज पडणे, भिंत कोसळणे, बुडून मृत्यू अशा अनेक घटना घडल्या असून त्यात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे.
३७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या १७ तुकड्या, एसडीआरएफच्या २७ तुकड्या आणि लष्कराच्या ९ तुकड्यांव्यतिरिक्त हवाई दल आणि तटरक्षक दलाच्या तुकड्याही राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. ज्याने आतापर्यंत ३७,००० हून अधिक लोकांना वाचवलं आहे. ४२,०८३ लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच ५३ लोकांना हवाई मार्गाने सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.