गुजरातेत राज्यसभेच्या चार जागांची निवडणूक चुरशीची, भाजपचे कोण दोघे निवडून येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:41 AM2020-05-13T06:41:10+5:302020-05-13T06:41:39+5:30
ही निवडणूक गेल्या मार्च महिन्यात होणार होती. आपण आपल्या तिन्ही उमेदवारांना जिंकून आणू शकतो, अशी भाजपला खात्री होती. याच आत्मविश्वासातून भाजपने काँग्रेसचे पाच आमदार फोडण्यात यश मिळवले व त्यामुळे काँग्रेसचे आमदार ६८ वर आले.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : गुजरातचे कायदामंत्री भूपेंद्रसिंह चुडासामा यांची निवडणूक गुजरात उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे राज्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची होणार आहे. भाजपने तीन, तर काँग्रेसने दोघांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
ही निवडणूक गेल्या मार्च महिन्यात होणार होती. आपण आपल्या तिन्ही उमेदवारांना जिंकून आणू शकतो, अशी भाजपला खात्री होती. याच आत्मविश्वासातून भाजपने काँग्रेसचे पाच आमदार फोडण्यात यश मिळवले व त्यामुळे काँग्रेसचे आमदार ६८ वर आले.
गुजरात विधानसभेच्या दोन जागा रिक्त आहेत व भाजपला १०३ आमदारांचा पाठिंबा होता. आता भूपेंद्रसिंह चुडासामा यांची निवड रद्द झाल्यामुळे १०२ आमदार झाले.
काँग्रेसला अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांचा पाठिंबा आहे. सहा आमदार कमी झाल्यामुळे विधानसभेची सदस्य संख्या १७४ वर आली. यातून हे स्पष्ट झाले की, दुसऱ्या पसंतीची मतेच आता राज्यसभा निवडणुकीचा निकाल निश्चित करतील. यातून काँग्रेस आपले उमदेवार भरतसिंह सोळंकी आणि शक्तिसिंह गोवील यांना विजयी करू शकेल.
भाजपने रमिला बेन बारा, नरहरी अमीन आणि अक्षय भारद्वाज यांना रिंगणात उतरवले असून, यातील कोणत्या दोघांना विजयी करायचे हे त्याला ठरवावे लागेल. भूपेंद्र सिंह चुडासामा यांचे सदस्यत्व वाचवण्यासाठी भाजपला सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागेल म्हणजे उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती मागता येईल.
ज्येष्ठ विधिज्ञ सिब्बल काय म्हणतात?
ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांचे म्हणणे असे आहे की, जर उच्च न्यायालयात भ्रष्ट आचरण सिद्ध झाले असेल, तर सर्वोच्च न्यायालय स्थगिती आदेश देणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुडासामा यांना पक्षातून काढून टाकावे व सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयाच्या निकालाला दाद मागू नये, म्हणजे स्वच्छ राजकारणाचा मार्ग प्रशस्त होईल, अशी सिबल यांची मागणी आहे.
भूपेंद्र सिंह चुडासामा यांची निवडणूक टपाल मतपत्रिकांच्या मोजणीत रिटर्निंग अधिकाºयाशी हातमिळवणी करून घोटाळा केल्याचा ठपका ठेवून रद्द झाली आहे.