VIDEO: उड्डाण करताना अडखळली अन्...; पॅराग्लायडिंगवेळी ६० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 11:18 IST2025-01-20T11:12:50+5:302025-01-20T11:18:17+5:30
हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंगदरम्यान, गुजरातच्या तरुणीचा ६० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला.

VIDEO: उड्डाण करताना अडखळली अन्...; पॅराग्लायडिंगवेळी ६० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू
Dharamsala Paragliding: हिमाचल प्रदेशातील कांगडा आणि कुल्लू जिल्ह्यात २४ तासांत पॅराग्लायडिंगच्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे शनिवारी संध्याकाळी उड्डाण करताना झालेल्या अपघातामुळे गुजरातमधील एका १९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि २९ वर्षीय पॅराग्लायडिंग पायलट जखमी झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या अपघातात पॅराग्लायडिंग असिस्टंट गाईडला किरकोळ दुखापत झाली असून गुजरातच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील लोकप्रिय इंद्रनाग पॅराग्लायडिंग साइटवर मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या अपघातात गुजरातमधील एका १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. भावसार खुशी (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. टेक ऑफच्या वेळी अहमदाबादच्या खुशी ६० फूट खाली पडली. तिच्यासोबत पायलटही पडला आणि त्याला दुखापत झाली. मुनीश कुमार (२९) असे पॅराग्लायडिंग पायलटचे नाव आहे, तो कांगडा जिल्ह्यातील धरमशाला येथील ताहू चोला गावचा रहिवासी आहे. त्याला उपचारासाठी तांडा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.
उड्डाण करताना खुशीचा तोल गेला आणि त्यामुळे दोघेही खाली पडले. खुशीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला तात्काळ झोनल हॉस्पिटल धर्मशाला येथे नेण्यात आले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. खुशी तिच्या कुटुंबासह धर्मशाला येथे फिरण्यासाठी साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी आली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल. धर्मशाला पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली की सुरक्षेच्या निकषांकडे दुर्लक्ष केल्याने याचा पोलीस शोध घेत आहेत.
A tragic video from Dharamshala’s Indrunag paragliding site has surfaced, where Bhavsar Khushi, a young girl from Ahmedabad, Gujarat, fell during a tandem flight take-off, resulting in her death. The pilot has sustained injuries and is admitted to tanda .#HimachalPradeshpic.twitter.com/WwCmDrZ5DP
— Nikhil saini (@iNikhilsaini) January 19, 2025
दुसरीकडे, पॅराग्लायडिंगच्या वेळी सुरक्षेच्या गोष्टींकडे वारंवार दुर्लक्ष केला गेल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पोलीस आणि प्रशासन याप्रकरणी पायलटची चौकशी करत आहेत. प्राथमिक चौकशीत, टेक ऑफ पॉइंट आणि पॅराग्लायडिंगच्या उपकरणांचा तपास केला जात आहे.
धर्मशाला हे साहसी खेळांसाठी आणि इंद्रू नाग टेक-ऑफ पॉइंटसाठी लोकप्रिय आहे. दरवर्षी शेकडो पर्यटक पॅराग्लायडिंगचा थरार अनुभवण्यासाठी इथं येत असतात. मात्र गर्दीमुळे पॅराग्लायडिंग करताना अपघात वाढले आहेत. सुरक्षा निकषांकडे दुर्लक्ष आणि योग्य प्रशिक्षण नसणं हे या मागचे कारण असल्याचे म्हटलं जात आहे.