गुजरात सरकारने दिला वृत्तपत्रांना आश्वासक पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 11:54 PM2020-05-06T23:54:27+5:302020-05-06T23:54:43+5:30
आयएनएसनकडून मुख्यमंत्री रूपानी यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता
नवी दिल्ली : वृत्तपत्रे अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत असताना गुजरात सरकारच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल इंडियन न्यूज पेपर सोसायटीने (आयएनएस) कृतज्ञता व्यक्त करून त्यांची प्रशंसा केली आहे. आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांनी सोसायटीच्या सदस्यांच्या वतीने निवेदनाद्वारे ही कृतज्ञता व्यक्त केली.
विजय रूपानी यांनी वृत्तपत्रे ही खऱ्या, अचूक आणि विश्वासार्ह माहितीचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे नमूद करून लोकांना खºया बातम्या देऊन ते त्यांना खोट्या बातम्यांपासून दूर ठेवतात. हीच आजची गरज आहे, असे म्हटले. एप्रिल २०२० पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सरकारी जाहिरातींची थकलेली सगळी बिले अदा करून या अत्यंत गरजेच्या वेळी सरकार वृत्तपत्रांना पाठिंबा देईल, असे आश्वासन रूपानी यांनी दिले. सरकारचे हे आश्वासन स्वागतार्ह असून, त्यातून वृत्तपत्र उद्योगाला खूप आवश्यक असलेला दिलासा मिळेल. कारण गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात या उद्योगाचे जवळपास ४,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे गुप्ता यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडूनही आम्हाला अशाच पाठिंब्याची गरज आहे कारण गेल्या काही आठवड्यांत आयएनएसने केंद्र सरकारला प्रोत्साहन पॅकेजची विनंती केली होती व एप्रिल २०२० पर्यंत प्रसिद्ध वृत्तपत्रांत, जाहिरात संस्थांकडे प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची थकलेली बिले अदा केली जावीत यासाठी सगळी राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच केंद्र सरकारने ताबडतोब पावले उचलावीत म्हणून त्यांचा पाठिंबा मागितला होता. यामुळे वृत्तपत्र उद्योगासमोरील संकटाला व अडचणींना तोंड देण्यासाठी बळ मिळेल, असे आयएनएसने म्हटले.
तीस लाख लोकांना रोजगार
वृत्तपत्रे ही आतापर्यंत कधी नव्हत्या अशा अडचणी आणि प्रक्षुब्ध दिवसांना तोंड देत आहेत. या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ३० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तथापि, अनेक अडचणींना तोंड देत व वाढता खर्च असताना व परतावा काही नसतानाही वृत्तपत्र हे प्रत्येक सकाळी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत पोहोचले पाहिजे यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेलेली आहेत, असे शैलेश गुप्ता यांनी त्यात म्हटले आहे.