Acharya Devvrat : "हिंदू एक नंबरचे ढोंगी", गुजरातच्या राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 03:43 PM2022-09-08T15:43:57+5:302022-09-08T15:45:19+5:30
Acharya Devvrat : बुधवारी नर्मदा जिल्ह्यातील पोईचा गावात सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत हे वक्तव्य केले
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हिंदू ढोंगी असल्याच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बुधवारी नर्मदा जिल्ह्यातील पोईचा गावात सेंद्रिय शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलताना राज्यपाल आचार्य देवव्रत हे वक्तव्य केले. दोन प्रमुख राज्य वृत्तपत्रांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे.
यामध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटले आहे की, "लोक 'जय गौ माता'चा जप करतात. ते दूध देईपर्यंत गाय गोशाळेत ठेवतात. गाईने दूध देणे बंद केले की ते तिला रस्त्यावर सोडतात. त्यामुळे मी म्हणतो की हिंदू एक नंबरचे ढोंगी आहेत. हिंदू धर्म आणि गाय हे आपापसात जोडलेले आहेत, पण याठिकाणी लोक स्वार्थासाठी 'जय गौ माता' चा जप करतात."
पुढे राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, "लोक देवाची प्रार्थना करण्यासाठी मंदिर, मशिदी, चर्च, गुरुद्वारामध्ये जातात, जेणेकरून देव त्यांना आशीर्वाद देईल. मी म्हणतो की, जर तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वाटचाल केली तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल. रासायनिक खतांचा वापर करून तुम्ही प्राणी मारता, हे मी शास्त्रीय पुराव्यानिशी सांगत आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास प्राण्यांना जीवदान मिळेल."
नैसर्गिक शेती या विषयातील पीएचडी कार्यक्रमाचा शुभारंभ
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी रविवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबिलिटी (IIS) येथे गुजरात विद्यापीठातर्फे नैसर्गिक शेती या विषयातील पीएचडी कार्यक्रमाचा शुभारंभ केला. गुजरात विद्यापीठात बीएससी, एमएससी, पीएचडी व्यतिरिक्त आता नैसर्गिक शेतीचाही अभ्यास करता येणार आहे. राज्य विद्यापीठात नैसर्गिक शेतीमधील पीएचडी कार्यक्रम हा अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम असेल. त्यात पर्यावरण व्यवस्थापन, नवोपक्रम, उद्योजकता, कृषी उद्योजकता, कृषी व्यवसाय, मूल्य साखळी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.